महाराष्ट्र दिन विशेष : प्रगतशील महाराष्ट्र

महाराष्ट्र दिन विशेष : प्रगतशील महाराष्ट्र

1 मे 1960 रोजी लौकिकार्थाने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असली, तरी त्यापूर्वी सातवाहन काळापासून महाराष्ट्र भूमी अस्तित्वात होती. 'महंत म्हणूनि महाराष्ट्र बोलिजे' असे वर्णन चक्रधरांनी महाराष्ट्राचे केलेले आहे. राष्ट्रकुट काळापासून महाराष्ट्राला अधिक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. महाराष्ट्राला खरी ओळख प्राप्त करून दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक चळवळीत महाराष्ट्राचे ऐक्य आणि अखंडत्व कायम राहावे आणि मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य एकत्र यावे म्हणून 104 हुतात्म्यांनी बलिदान दिले. समान भाषिक राज्याची अभिव्यक्ती, समान विकासाची लालसा आणि समान सांस्कृतिक अभिव्यक्ती या तीन कारणांमुळे महाराष्ट्राचे ऐक्य आणि अखंडत्व आजही टिकून आहे.

महाराष्ट्र हे सर्वांगीण विकासाच्या द़ृष्टीने आघाडीवर असणारे प्रगतशील राज्य आहे. लोकसंख्येच्या द़ृष्टीने विचार करता महाराष्ट्र देशात दुसर्‍या स्थानावर आहे; तर क्षेत्रफळाच्या द़ृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचा जीडीपी अव्वल असून, राज्यातील जनतेचे सुखसमाधानही वाखाणण्याजोगे आहे. 1 मे 1960 रोजी लौकिकार्थाने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असली, तरी त्यापूर्वी सातवाहन काळापासून महाराष्ट्र भूमी अस्तित्वात होती. 'महंत म्हणूनि महाराष्ट्र बोलिजे' असे वर्णन चक्रधरांनी महाराष्ट्राचे वर्णन केलेले आहे. माझा मराठीचा बोल कौतुके। परि अमृताते हि पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन' असा आत्मविश्वास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी प्रकट केला होता.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सावतामाळी यांसारख्या संतांची परंपरा ही मराठी संस्कृतीचे भूषण आहे. राष्ट्रकुट काळापासून महाराष्ट्राला अधिक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. महाराष्ट्राला खरी ओळख प्राप्त करून दिली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून शिवाजीराजांनी संबंध दक्षिण भारत मुक्त केला. पुढे पहिल्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले आणि दिल्लीचे तख्त खरोखरीच राखिले. 1818 मध्ये ब्रिटिशांनी मुंबई राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि 1947 पर्यंत मुंबईच्या माध्यमातून पश्चिम भारतावर राज्य केले. पुढे भारताच्या स्वातंत्र्यानंतरही 1947 ते 1960 मुंबई राज्य अबाधित राहिले. या राज्यात गुजरात, कर्नाटकातील काही भाग सामील होता. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक चळवळीत महाराष्ट्राचे ऐक्य आणि अखंडत्व कायम राहावे आणि मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य एकत्र यावे म्हणून 104 हुतात्म्यांनी बलिदान दिले. समान भाषिक राज्याची अभिव्यक्ती, समान विकासाची लालसा आणि समान सांस्कृतिक अभिव्यक्ती या तीन कारणांमुळे महाराष्ट्राचे ऐक्य आणि अखंडत्व टिकून आहे.

आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीतील पहिला कालखंड 1960 ते 2000 होय. यापैकी 1960 ते 1975 हा कालखंड यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या प्रभुत्त्वाचा कालखंड होता. या काळात महाराष्ट्रात सहकारी चळवळ, शेती, उद्योग, शिक्षण यांच्या विकासाचा पाया घातला गेला. या कालखंडातील महाराष्ट्रातील प्रगतीचा आढावा घेत असताना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी घातलेल्या पायाभूत बैठकीचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली. मराठी विश्वकोष स्थापन केला आणि त्याबरोबरच मराठीच्या विकासासाठी मौलिक पावले टाकली. पुढे 1972 च्या दुष्काळाने महाराष्ट्राला घेरले; पण या दुष्काळाचाही महाराष्ट्राने निकराने सामना केला. इंदिरा गांधींनी एका बैठकीत महाराष्ट्रात इतकी कृषी विद्यापीठे आहेत, परंतु हरित क्रांती कुठे आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे व्यथित होऊन वसंतराव नाईक यांनी त्यावेळी राज्यात हरितक्रांती घडवून आणण्यासाठी जोरकस प्रयत्न केले.पुढे शरद पवारांनी केलेल्या फलोत्पादन क्रांतीने महाराष्ट्रातील कृषी जीवनाचे चित्र पालटण्यास मदत झाली. मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राला प्रगत माहिती तंत्रज्ञान धोरण दिले आणि राज्यातील पुणे शहर हे आयटी सिटी म्हणून उदयास आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात औद्योगिक आघाडीवरही अनेक नवनवीन प्रयोग गेल्या 60-62 वर्षांत झाले. त्यातून गुजरातला मागे टाकून महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक गुंतवणुकीचे राज्य बनून पुढे आले.

परकीय गुंतवणूक आकृष्ट करण्यामध्ये महाराष्ट्राचा बहुतांश वेळा पहिला क्रमांक राहिला आहे. कृषी क्षेत्रातील स्वयंपूर्णता आणि औद्योगिक क्षेत्रातील नव्या-नव्या औद्योगिक वसाहतींचा उदय यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळत गेली. विशेषतः, गेल्या काही वर्षांत वाहननिर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील मुंबईप्रमाणेच पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरांनी घेतलेली झेप उल्लेखनीय आहे. त्याचप्रमाणे औषधे आणि रसायने या क्षेत्रांतही महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे. ऊर्जा निर्मितीतही महाराष्ट्राने केलेले प्रयोग महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योगाने देशात आणि जागतिक बाजारपेठेत उत्तुंग झेप घेऊन एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

साखरेप्रमाणेच इथेनॉलनिर्मितीमध्येही चांगले यश मिळवून देशाचे इंधनावरील परावलबित्व संपवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टामध्ये महाराष्ट्र मोलाचा वाटेकरी ठरणार आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाचा विचार करता रस्ते मार्गांचे महत्त्व सर्वाधिक असते. रस्ते म्हणजे त्या-त्या राष्ट्राच्या जीवनरेषा असतात. त्याद़ृष्टीने महाराष्ट्रातील महामार्गांचा विकास आणि अंतर्गत वाहतुकीसाठीच्या रस्त्यांची उभारणी यामुळे दळणवळणाला मोठी चालना मिळाली आहे. रस्तेमार्गांबरोबर महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत विमानतळांचा विकास होतो आहे. शिर्डी विमानतळाने उत्पन्नाच्या बाबतीमध्ये मुंबईनंतर दुसरा क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्राला लाभलेले निसर्गाचे वरदान, समुद्रकिनारे, धबधबे, प्राचीन लेणी, गडकिल्ले आणि इतिहासकालीन वास्तू, मंदिरे यामुळे राज्याने पर्यटनाच्या क्षेत्रातही जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवलेला आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील कृषी पर्यटनाकडेही पर्यटकांचा ओढा वाढत चालला असून, त्यातून शेतकर्‍यांना एक नवा पूरक व्यवसाय उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास हातभार लागला आहे.

शिक्षणक्षेत्राचा विचार करता महाराष्ट्रात 10 कृषी विद्यापीठे, 40 बिगर कृषी विद्यापीठे आणि सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठेही आहेत. गेल्या दोन-तीन दशकांत महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयांचा विकास होतो आहे, सुश्रुषा किंवा परिचारिका महाविद्यालये वाढत आहेत. दंतवैद्यक महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये वाढत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रातील या संख्यात्मक वाढीनंतर गुणवत्तावृद्धी, गुणात्मक सुधारणांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुणे विद्यापीठ हे पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते. तशी ओळख प्रत्येक विद्यापीठाला मिळाली पाहिजे, यासाठी येत्या काळात प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच खासगी आणि सार्वजनिक विद्यापीठांमध्ये समन्वय साधावा लागेल. इतर राज्यांच्या तुलनेत प्राथमिक आणि उच्च शिक्षणामध्ये नवीन शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्रात विलंब झाला आहे. याबाबत महाराष्ट्राला येत्या काळात विशेष प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्राच्या गेल्या सहा दशकांतील आढावा पाहिल्यानंतर भावी आव्हानांचा विचार करता सर्वप्रथम शेती क्षेत्राचा विचार होणे आवश्यक आहे. यामध्ये राज्यातील एकाही शेतकर्‍याला आत्महत्या करण्याचा विचार मनात येऊ नये, हे उद्दिष्ट ठेवून कृषी क्षेत्रासाठीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सिंचनाच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात पैसा खर्च होऊनही सिंचनाखालील क्षेत्र वाढले नाही. जलयुक्त शिवार, शेततळ्यांच्या योजना राबवल्या गेल्या; पण आजही भूजलक्षेत्र घसरत चालले आहे. राज्यातील शेतीचा विकास करण्यासाठी सिंचनसुविधांची उपलब्धता हा गाभा आहे, हे विसरून चालणार नाही.

शेतकर्‍यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आता नवे प्रयोग आणि नवे प्रकल्प करण्याची वेळ आली आहे. शिक्षण, शेती आणि उद्योग यामध्ये सुसूत्रता आणावी लागेल. याखेरीज सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन शेतमालाच्या निर्यातवाढीसाठी विशेष यंत्रणा उभी केली पाहिजे. फळे-भाजीपाल्यांमधील अतिरिक्त उत्पादनाच्या साठवणुकीचा प्रश्न आजही कायम असून, यामुळे होणारे शेतकर्‍यांचे आणि शेतमालाचे नुकसान मोठे आहे. त्याबाबतही नियोजनात्मक पावले टाकावी लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांना मिळणार्‍या बाजारभावाबाबत हमी कशी देता येईल, याचा विचार प्राधान्याने होणे गरजेचे आहे. कारण, त्याशिवाय शेतकरी आर्थिकद़ृष्ट्या स्वावलंबी होणार नाही. कृषिमालावर प्रक्रिया करणार्‍या फळप्रक्रिया उद्योग, भाजीपाला प्रक्रिया उद्योग, तेल घाणे यांसारख्या प्रक्रिया उद्योगांना पाठबळ देऊन शेतकर्‍यांच्या नव्या पिढीला गावपातळीवरच स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. देशातील सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात असूनही राज्यातील पाणीप्रश्न सुटलेला नाही. नगरातून होणारा अनियमित पाणीपुरवठा आज मराठवाडा-विदर्भासह अनेक भागांमध्ये 8-8 दिवसांतून एकदा पाणी येते. या नागरिकांना रोजच्या रोज पाणी कसे मिळेल, यासाठी नियोजन करावे लागेल. पंपिंगचा खर्च टाळण्यासाठी 8-10 दिवसांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो; पण या काळात बाष्पीभवनाने हे पाणी कमी होऊन जाते. नित्य आणि नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी शहरांची विभागणी करून तेथे समांतर जलवाहिन्या करणे गरजेचे आहे.

याबरोबर शेतीक्षेत्रावरील अवलंबित्व करण्यासाठी उद्योगांचा विकास करणे गरजेचे आहे. टी. आर. ब्रह्मानंद या प्रख्यात अर्थतज्ज्ञांनी असे म्हटले होते की, महाराष्ट्र हा देशातील प्रमुख पाच अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही राज्ये देशाच्या अर्थकारणाचे पंचखांब आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी आहे. असे असूनही महाराष्ट्राचे अर्थकारण आज 63 वर्षांनंतरही हेलकावे खाताना दिसून येते.

– प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news