महामानवाच्या कर्नाटकातील पहिल्या स्मारकाचे निर्माते देवराय इंगळे | पुढारी

महामानवाच्या कर्नाटकातील पहिल्या स्मारकाचे निर्माते देवराय इंगळे

 ६ डिसेंबर हा दिवस विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होय! घनघोर उसळत राहिलेल्या समुद्राला आहोटीच ग्रहण जसं लागावं किंवा उष्ण आकाशात तळपत्या सूर्यांने जस धरतीच्या कुशीत अगदी अलगदपणे शिराव, अशा साऱ्यांची अनुभुती देणारा हा दिवस होय! शुन्यातून निर्माण होत गेलेल्या आणि सबंध जगभर पसरुन उरलेल्या या अफाट कर्तृत्ववान महामानवाच्या कर्तृत्वाला त्याच्या सामान्य कार्यकर्त्यांनी अगदी शेवटपर्यंत साथ- सोबत दिली. त्या विश्वमानवाचा अखंड प्रकाश सदैव उजळत रहावा म्हणून या सहकार्यांनी आपल्या आयुष्याची मशाल कायम पेटती ठेवली. अशा या विश्वाला वंदनीय ठरलेल्या महापुरुषाचे आपण जेव्हा स्मरण करतो तेव्हा, त्यांच्या कार्याबरोबरच त्यांच्या सहकाऱ्यांची आठवण येणे अगदी स्वाभाविक ठरते. बाबासाहेबांचे हे अनुयायी साऱ्या देशभर विखरून राहिलेले पाहायला मिळतात. आजपर्यंत त्या अनुयायांची जितकी बाजू लोकापर्यंत पोहोचायला हवी होती तितकी ती पोहोचू शकली नाही. आजही बाबासाहेबांसाठी व्यवस्थेशी मुकाबला करण्यासाठी आयुष्यभर संघर्षात उतरलेल्या या महानायकांना व्यवस्थेने आजही दुर्लक्षितच ठेवलेले पहावयास मिळते. त्यापैकीच एक म्हणजे देवराय इंगळे.

देवराय इंगळे हे १९६० सालापूर्वी मुंबई प्रांताचा भाग असणाऱ्या मात्र, १९६० नंतर कर्नाटक प्रदेशाचा भाग बनलेल्या इंगळी (ता. चिकोडी, जि बेळगांव) या गावाचे सुपुत्र होय. त्यांचे सारे जीवन म्हणजे, सबंध कर्नाटक प्रांताला ‘आंबेडकर वादाचा’ चेहरा मिळवून देणारे एक आदर्श व्यक्तीमत्व होय. याच उपेक्षित आणि दुर्लक्षित आंबेडकरवादी अनुयायाने विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातील पहिले स्मारक कर्नाटकमध्ये उभे केल्याच्या नोंदी पहावयास मिळतात. त्यांच्या या कार्याची माहिती मी जेव्हा कर्नाटक प्रांतात जावून तपासून घेतली तेव्हा, लक्षात आले की, त्यांचे डॉ. आंबेडकर यांच्यासहित घडून आलेले कार्य हे अखंड हिंदुस्तानातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिले स्मारक म्हणून नजरेत भरते. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या उतुंग कार्याला उजाळा मिळावा, इतकीच इच्छा आजमितीला आहे.

सन १९२४ साली आपले उच्च शिक्षण संपवून भारतात परतलेल्या डॉ .आंबेडकर यांनी बेळगाव येथील काँग्रेस अधिवेशनाला हजेरी लावली होती, तेव्हाची ही गोष्ट आहे ! अधिवेशनाला आमंत्रित केल्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्याकडे काँग्रेसच्या लोकांनी विशेषता, गांधीजींनीही पूर्ण दुर्लक्ष केले होते. त्यामुळे रागाने तेथून बाहेर पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसजनांचा प्रचंड राग आला होता. त्यांच्यासोबत असलेल्या देवराय यांना बाबासाहेबांची झालेली ही घुसमट लक्षात आली. देवराय तात्काळ अधिवेशनाच्या पेन्डॉलमध्ये घुसले. त्यांनी अधिवेशनात उपस्थित असलेल्या तमाम बहिष्कृतांना बाहेर काढले. पाचशे मीटर अंतरावर असलेल्या आमराईत त्यांनी आपल्या अनुयायांना एकत्र केले. डॉ. बाबासाहेबांची त्यांनी सर्वाना ओळख करून दिली. आणि पुढचा मार्ग यशस्वी झाला.

बाबासाहेबांनी उपस्थितांना काँग्रेसचे धोरण आपल्या समयोचित भाषणात सविस्तर कथन केले. तेव्हा उपस्थित मंडळी काँग्रेसवर भयंकर भडकली. त्यांनी काँग्रेसचा निषेध करण्यासाठी स्वतंत्र सभा घेण्याचा निश्चय केला. डॉ. बाबासाहेबांनी या ठिकाणी केलेल्या भाषणात काँग्रेस आणि गांधी यांचा जाहीर निषेध केला आणि सभा बरखास्त झाली. डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार करत देवराय आणि त्यांचे साथीदारही परतले. मात्र, देवराय यांनी अल्पावधीत घडवून आणलेल्या या छोटया सभेने काँग्रेस जनात मोठी खळबळ उडाली होती. देवराययाकडून बाबासाहेबांची सभा त्त्वरीत लावण्याचे कारणही मोठे मजेदार होते. देवराय हे आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ‘शाहू-आंबेडकर’ यांच्या १९२० सालच्या माणगाव परिषदेला उपस्थितीत राहिले होते.

शाहू महाराजांनी “डॉ .आंबेडकर हे देशाचे भावी नेते होतील ” अशी भविष्यवाणी माणगाव येथे केली होती, ती देवरायांनी प्रत्यक्ष ऐकली होती. माणगाव परिषदेचे ते साक्षीदार होते. त्यामुळे आपल्या नेत्याचा काँग्रेसकडून घडलेला उपमर्द देवराय यांना सहन झाला नाही. त्याचा उद्रेक म्हणूनही डॉ .बाबासाहेब यांची ही पार पडलेली सभा होती. माणगाव आणि नागपूर येथे पार पडलेल्या अस्पृश्य परिषदेत पारित झालेल्या ठरावांना समोर ठेवून डॉ. आंबेडकर यांनी ‘१९२४ साली पहिली बहिष्कृत हितकारिणी सभा’ या नावाची संस्था निर्माण केली होती. या सभेतील तत्वांचा प्रचार आणि प्रसार करीत तमाम बहिष्कृतांचे संगठण उभे करावे, म्हणून त्यांनी सर्वत्र दौरे सुरू केले. या काळात देवरायांनी बाबासाहेबांची संपर्क साधला. त्यांच्या इच्छेनुसार देवराय यांनी पुढे निपाणी ( जि. बेळगांव) येथे ११ नोव्हेंबर १९२५ साली पहिली रितसर सभा घेतली. निपाणी नगरपालिकेतील मोठे गृहस्थ असणारे श्री. मसू जोती रावण हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते. या ठिकाणी झालेल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांनी मुलांच्या वसतिगृहाची कल्पना मांडली. त्याबरोबरच देवदासी प्रथा निर्मुलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाचा प्रभाव पडला. तसे शाहू महाराजांच्या प्रेरणेने देवराय यांचे कार्य सुरु झालेच होते. शाहू महाराज यांच्यानंतर डॉ .आंबेडकर यांना सर्वस्व मानलेल्या देवराय यानी आपल्या देवदासी प्रथा निर्मुलनाला मोठी गती दिली. त्यांनी या कार्यासाठी लिहिलेल्या नाटकाला ‘ बहिष्कृत भारत बोधिनी ‘असे नाव दिले. डॉ. बाबासाहेबांच्या ‘ बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्राचे सर्व सामान्यामध्ये बिजारोपण करताना त्यांनी किती मोठी शकल लढवली होती याची साधार कल्पना येवून जाते. याच वेळी देवराय यांनी खेडोपाड्यातील मुलांना एकत्र करून बेळगांव येथे डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे प्रतिबिंब उमटेल असे वसतीगृह स्थापना केले.

१९२८ साली हे वसतिगृह धारवाड येथे हलविण्यात आले. बाबासाहेबांच्या विचारांचे प्रतिबिंब असलेली ही इमारत म्हणजे, डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे साऱ्या हिंदुस्तानातील पहिले स्मारक होय!. देवरायांची ही कृती म्हणजे, साहित्य आणि शिल्प यांच्या माध्यमातून उभी राहिलेली डॉ .आंबेडकर यांची पहिली वहिली स्मारके होय! महत्त्वाचे असे की, माणगाव, नागपूर नंतरची तिसरी अस्पृश्य परिषद म्हणजे, ही निपाणी येथील ‘अस्पृश्य परिषद’ होय की, जी देवराय यांनी आयोजित केली होती.

डॉ .बाबासाहेब यांनी आपल्या आयुष्यात आपल्या जातीला दुषण म्हणून लागलेला ‘महार’ शब्द काढून टाकण्यावर मोठा भर दिला होता. १९३६ च्या नायगाव धर्मांतर परिषदेत आणि १९३७ च्या सोलापूर येथील सभेत डॉ. बाबासाहेबांनी ‘महार किंवा मांग ‘या नावात काय आहे, की त्यात तुम्हाला अभिमान वाटावा’ असे खुलेआम अनुयायांना सुनावले होते. देवरायांनी हा विचार कृतीत उतरविला होता. नाक उपाधीने प्रदर्शित होणारी जात नाकारत देवराय यानी रायनाकचे रायण्णावर, भिमनाकाचे भिमण्णावर, मेघनाकाचे मेघण्णावर अशी नावे बदलली. त्याच बरोबर रायबाग आणि चिकोडी तालुक्यातही देवराय यानी नामांतराचा मोठा प्रयत्न घडवून आणला.

तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. चिकोडी तालुक्याचे मामलेदार यांच्या साक्षीने त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांची नावे बदलून टाकली. जसे मिरजेत राहणाऱ्यांना मिरजकर, कोडणीत राहणाऱ्यांना कोडणीकर, सांगलीत राहणाऱ्यांना सांगलीकर अशी शेकडो नावे त्यानी बदलून टाकली. त्यांची ही नामांतराची चळवळ अनंत काळ चालू राहिली होती.

बाबासाहेबांनी १९२७ साली महाड येथे पुकारलेल्या सत्याग्रहात देवराय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे योगदान दिलेले पहावयास मिळते. महार वतन बिल असो की बाबासाहेब यांनी विविध वेळी प्रकाशित केलेली चळवळीची वृत्तपत्रे असो. ही वृत्तपत्रे आणि सामाजिक लढे बहिष्कृतांच्या जीवनाचा भाग बनावीत म्हणून देवराय यांनी विविध सभा ,पथनाट्य आणि बैठकामधून त्याविषयीचे ठराव मांडले आणि त्याची अंमलबजावणीही करण्याचा प्रयत्न केला.

सरकारी जमिनीचे वाटप या देशातील बहिष्कृतांना करुन सरकारने देश बलवान करावा, अशी भूमिका बाबासाहेबांनी सदैव जपली. असंख्य ठिकाणी त्याविषयी भाषणे केली. बहिष्कृतात जागृती आणण्यासाठी त्यानी असंख्य सभा भरविल्या. १९३९ मध्ये कोल्हापूरात बाबासाहेबांनी ” दलित प्रजा परिषद” या नावाची सभा घेऊन लवकरच संस्थाने सरकारात विलीन होणार असल्याचे सांगितले. करवीर छत्रपतींच्याकडे असलेली हजारो एकर जमीन सरकारात जमा होणार. असे जाहीरपणे सांगितले. जमीन सरकारात जमा होत असेल तर ती गोर- गरिब जनतेला का देवू नये ? गोर – गरिबांना जमीन देवून त्या बहिष्कृतांच्याबद्दल आपल्या मनात अपार प्रेम आहे, याची त्यांनी प्रचिती दयावी असा निरोपही त्यानी छत्रपती राजाराम महाराज याना दिला होता. तेव्हा महाराजांना डॉ. आंबेडकर यांचे म्हणणे पटले.

देवराय यांनी या संधीचा फायदा उचलण्याचे ठरविले. त्यांनी अनेक सभा, मेळावे घेवून आपल्या जनतेला सजग केले, तयार केले. देवराय यानी आपल्या चिकोडी, रायबाग आणि आसपासच्या भागातील अस्पृश्यांसाठी तब्बल १८ ते २० हजार एकर जमिनीचे क्षेत्र करवीर संस्थानाकडून मिळवून दिले. यासाठी त्यांना बी. एच. वराळे आणि शिष्टमंडळाने महाराजांच्याकडे निवेदनाद्वारे मांडलेल्या कैफियतीचा चांगला उपयोग झाला होता. देवदासी प्रथा निर्मुलनामुळे देवरायांच्या पाठीमागे स्त्रियांचे मोठे संगठन उभा राहिले होते. अनेक कार्यातून माणसे जोडली गेल्यामुळे देवरायांच्या चळवळीला विवीध जाती- जमातीचे पाठबळ मिळत गेले होते. गोर- गरीब अस्पृश्य मुला- मुलीसाठी त्यांनी टेलरिंग शाळांची निर्मीती केली होती.

देवराय हे मराठी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ते या नोकरीत फारसे रमले नाहीत. ते पूर्णाशाने सामाजिक चळवळीचे प्रणेते बनले होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या परिवर्तनवादी प्रत्येक कार्यक्रमाला सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या वृत्तपत्राला, त्यांच्या ऑफीस कार्यालयांच्या इमारत बांधणीला, तसेच त्यांच्या देश-विदेशातील दौ-यांना आर्थिक पाठबळ देऊन खारीचा वाटा उचण्याला कायम प्राधान्य दिलेले पाहायला मिळते.

१९३७ साली मुंबई प्रांताच्या निवडणूका जाहीर झाल्या. निपाणी – चिकोडी भागातून बाबासाहेबांनी शिक्षित आणि विश्वासू तरूण म्हणून बी. एच. वराळे यांची उमेदवारी जाहीर केली. देवराय यांच्या सामाजिक संघटन कौशल्याचा यावेळी फार चांगला उपयोग झाला. श्री. वराळे साहेब चिकोडी तालुक्याचे नेते म्हणून जनतेसमोर पहिल्यांदा आले. ते पुढे सलग तीन वेळा आमदार झाले. दलित नेतृत्वाला संधी मिळाल्याने अस्पृश्यांच्या कर्तृत्वाला मोठी संधी मिळत गेली. कार्यकर्त्यांच्या जीवनाला विकासाची प्रगतीची संधी मिळत गेली. सर्वत्र देवराय यांचा बोलबाला झाला.

अशाप्रकारे कर्नाटक प्रदेशामध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे बिजारोपण करणारे, त्या बिजाचे वृक्षात रुपांतर करणारे आणि त्या वृक्षाला लागलेल्या फुला- फळांचे समस्त बहुजनात लोकार्पण करणारे देवराय इंगळे हे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून महाराष्ट्राला म्हणावे तसे कधी समजलेच नाहीत. १०६० नंतर भाषावार प्रांत रचनेच्या मसुद्यानुसार मुंबई प्रांत महाराष्ट्र- कर्नाटक असा दुभंगला. त्या दोन राज्यात सिमेची बंधने आली. मात्र, मनाने हे दोन्ही भाग इतके एकरूप झालेले आहेत की, आजही सीमावासीय ” आम्हाला महाराष्ट्रात जायचे आहे’ असे धडधडीत तिथल्या प्रशासनाला ठणकावत असतात. या आंतरिक तळमळीमुळेच कर्नाटकातील बेळगाव नगरपालिकेवर मराठी बांधवांचा भगवा फडकत असतो. मात्र, आपण हे समजून घेतले पाहिजे की, १९६० पूर्वी देवराय इंगळे यांचे बाबासाहेबांच्या सोबत झालेले सारे कार्य हे मुंबई प्रांतात घडले होते.

देवराय यांचे सारे नातेवाईक आजही पश्चिम महाराष्ट्रातील सांगली- मिरज येथे रहात आहेत. महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेने, नेत्यांनी, विचारवंत, साहित्यिक यांनी देवराय यांचे कार्य विचारात घेतले तर त्याच्या आयुष्याची सारी उपेक्षा संपुष्टात येईल. देवराय यांचे इंगळी गावही महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसले आहे. बाबासाहेबांच्या वर पहिले पुस्तक लिहिले गेले ते १९४७ साली. त्यांचा पहिला पुतळा १९५० साली बांधला गेला. मात्र, देवराय यानी बाबासाहेबांची जी स्मारके उभा केली तीच मुळात १९३० साली! या गोष्टी देवराय यांचे आंबेडकर चळवळीतील योगदान निर्विवादपणे सिध्द करणा-या आहेत हे स्पष्ट होते. जो इतिहास विसरेल तो इतिहास….

साऱ्या जगात सुर्य किरणासम चमकत राहिलेल्या महामानवाला त्याच्या महापरिनिर्वानदिनी माझे कोटी कोटी प्रणाम!

डॉ. संभाजी बिरांजे 

(लेखक डॉ. संभाजी बिरांजे हे महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य असून पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत (बार्टी) संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. )

हेही वाचा :  

Back to top button