खेड तालुक्यात शेवटच्या दिवशी 596 नामनिर्देशनपत्रे दाखल | पुढारी

खेड तालुक्यात शेवटच्या दिवशी 596 नामनिर्देशनपत्रे दाखल

निमगाव दावडी; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी (दि. 2) शेवटच्या दिवशी एकूण 596 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. तर सरपंचपदासाठी 131 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. राजगुरुनगर येथे तालुका क्रीडा संकुलात 23 गावांतील निवडणूक रिंगणातील उमेदवार, सरपंच उमेदवारांसह, पॅनेलप्रमुख, गावनेते, आणि समर्थकांनी सकाळी 11 वाजेपासून मोठी गर्दी केली होती. ग्रामपंचायतीच्या दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी सोमवारी (दि. 5), नामनिर्देशनपत्रे माघारीची मुदत बुधवारी (दि. 7) दुपारी 3 वाजेपर्यंत आणि नंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत.

मतदान रविवारी (दि. 18) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात सकाळी 9 वाजता सुरू होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली. तालुक्यात 28 नोंव्हेबर ते 2 डिसेंबर या चार दिवसांत 23 ग्रामपंचायतींच्या एकूण 75 प्रभागातील सदस्यपदांसाठी एकूण 193 जागांसाठी 594 उमेदवारांनी 596 नामनिर्देशनपत्रे दाखल केली तर 23 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी 23 जागांसाठी 131 उमेदवारांनी 131 नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

यामध्ये देवोशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे लोकनियुक्त सरपंचपद बिनविरोध निवडीच्या मार्गावर आहे. तर तीन प्रभागातील सात जागांसाठी अवघी 11 नामनिर्देशनपत्रे दाखल होऊन काही जागावर एकच नामनिर्देशनपत्र आल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान मांजरेवाडी येथील लोकनियुक्त सरपंच अनिता मांजरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष विलास मांजरे यांनी गावापासून हुतात्मा राजगुरु क्रीडा संकुलापर्यत भव्य रोड-शो केला.

यावेळी माजी सरपंच काळुराम मांजरे, माजी उपसरपंच अशोकराव मांजरे, माजी उपसरपंच सतीश मलघे, विलास देवराम मांजरे व उमेदवार अनिता मांजरे, अशोक मलघे, निलेश मांजरे, शोभा गरुड, स्नेहल मांजरे, दया मांजरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. चार दिवसात ग्रामपंचायतनिहाय दाखल सदस्यांची नामनिर्देशनपत्र संख्या आणि कंसात सरपंचपदासाठी प्राप्त नामनिर्देशनपत्र संख्या

पुढीलप्रमाणे : सुरकुंडी 16 (3), साकुर्डी 24 (5), आंभू 22 (2), आव्हाट 29 (5), पापळवाडी 17 (6), कोरेगाव खुर्द 34 (6), मिरजेवाडी 14 (5), सिध्देगव्हाण 27 (8), साबळेवाडी 20 (13), भांबोली 33 (4), बहुळ 51 (10), शेलगाव 18 (3), देवोशी 11 (1), येणिये खुर्द 15 (3), अनावळे 19 (5), येलवाडी 33 (8), गारगोटवाडी 17 (4), शिरोली 46 (10), मांजरेवाडी 35 (7), दौंडकरवाडी 34 (6), चास 25 (7), बहिरवाडी 21 (5) आणि वाडा 35 (5).

दरम्यान तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी शुक्रवारी दुपारच्या सत्रात निवडणूक सभागृहात निवडणूक कामकाजाचा आढावा घेऊन ठाण मांडले तर नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी दिवसभर सर्व प्रशासकीय यत्रंणेवर देखरेख केली.

Back to top button