Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या पाहणी वेळी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हाती | पुढारी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या पाहणी वेळी मुख्यमंत्र्यांच्या वाहनाचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्र्यांच्या हाती

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते मुंबई जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची (Samruddhi Mahamarg) पाहणी आज (दि. ४) केली. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या महामार्गाची पाहणी करण्यासाठी नागपुरातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सोबत एकाच वाहनातून रवाना झाले. यावेळी नव्या कोऱ्या गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाती होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूच्या सीटवर बसले होते.

नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर हिंगणा परिसरातील वायफळ टोल नाका येथे हा शानदार कार्यक्रम होणार आहे. सुमारे १२ ते १५ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. यासोबतच नागपुरातील मेट्रोच्या दोन मार्गावरील नव्या सेवांचेही लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.

दरम्यान, आज सकाळी नियोजित वेळेपेक्षा सुमारे दीड तास उशिराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपुरात आगमन झाले. विमानतळावर स्वागताचा स्वीकार केल्यानंतर ते थेट खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी पोहोचले. तुमाने यांच्याकडील विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ही सदिच्छा भेट होती. ही भेट आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टेअरिंग वर बसले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या शेजारी बसले. या पाहणी दौऱ्यात काही ठिकाणी स्थानिकांशी संवाद, अधिकाऱ्यांशी संवाद उपयुक्त सूचना करीत या दोघांनीही समृद्धी महामार्गाची काही अंतरापर्यंत पाहणी केली.

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा समृद्धी महामार्ग आपल्या कार्यकाळात सुरू होत आहे. याचा निश्चितच आनंद आहे. हा महामार्ग विदर्भ, मराठवाड्यासोबतच महाराष्ट्राच्या दृष्टीने गेम चेंजर ठरेल. या रस्त्याच्या दुतर्फा समृद्धी येईल. हजारो लोकांना रोजगार मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button