पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीतील पाच दिवस प्रत्येकाच्या घरात, मंदिरे आणि ऑफिसमध्ये सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण पसरलेले असते. वसुबारस दिवसापासून ते भाऊबीजपर्यंत सर्वच दिवसाचे महत्व अनन्य साधारण आहे. या पाच दिवसांत लक्ष्मी पूजन, धनत्रयोदशी, नरक चतुदर्शी, बलिप्रतिपदा, कुबेर पुजन यासारख्या दिवासाची पूजा, खुशखुशीत फराळ आणि पाहुण्यांची रेलचेल असे मंगलमय वातावरण असते. दिवाळीत खास करून, लक्ष्मीपूजन, मातीचे दिवे लावणे आणि दारात, ऑफिसमध्ये काढण्यात येणाऱ्या रंगीबेरंगी रांगोळ्या आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतात. रांगोळीच्या काही ठिकाणी आपण स्पर्धादेखील पाहिली असेल. परंतु, आपणास लक्ष्मी पूजन आणि रांगोळीचे महत्त्व काय आहे हे माहित आहे काय?. त्यामुळे जाणून घेवूयात त्याच्याविषयी… ( Diwali 2023 )
दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकजण घर, ऑफिस इ. खास सजवण्यासाठी लाईटच्या माळा, फुलं, कागदाच्या विविध आकारातल्या रंगीबेरंगी झिळमिळ्यांचा वापर करतात. परंतु, या सजावटीतील एक प्रकार म्हणजे, रांगोळी. रांगोळी काढण्यामागे प्राचीन परंपरा असून त्याला काही धार्मिक, ऐतिहासिक कारणे आहेत. रांगोळीची परंपरा मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीपासून सुरू असल्याचा उल्लेख लेखनात सापडत आहे.
तर दुसरीकडे रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम आणि सीता अयोध्येत परतल्यावर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी अयोध्येतल्या नागरिकांनी घराच्या दारासमोर रांगोळ्यांसह दिवे प्रज्ज्वलित केले. त्यामुळेच दिवाळीला दिव्यासह रांगोळीला विशेष महत्त्व दिलं जातं. पूर्वी धान्य आणि पिठाचा वापर करून रांगोळी बनवली जायची. परंतु, सध्या रांगोळी तयार करण्यासाठी विविध घटकांचा वापर केला जातो. याशिवाय काही ठिकाणी रांगोळी काढण्यासाठी फुले, पाने आणि पाण्याचाही वापर केला जातोय. दिवाळीत स्वस्तिक, कमळाचे फूल, लक्ष्मीजींच्या पावलांचे ठसे, मोर अशी अनेक प्रकारची चिन्हे रांगोळीत साकारली जातात. तसेच शुभ कार्यापूर्वी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
रांगोळी हा शब्द प्राचीन संस्कृतमधून आला असून त्याचा अर्थ रंगांद्वारे भावना व्यक्त करणे असा आहे. भारतात अनेक ठिकाणी रांगोळीला 'अल्पना' या नावानेही ओळखले जाते. अल्पना हा शब्द 'अलेपना' या संस्कृत शब्दापासून बनविला आहे. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून आणि रंगांच्या साहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती म्हणजे रांगोळी होय.
रांगोळी उत्साहाचे प्रतीक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. देवी-देवतांच्या स्वागतासाठी, घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी मुख्य दरवाजात रांगोळी काढणे शुभ मानले जाते. रांगोळी काढल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होवून तो तणावमुक्त राहतो. तसेच दिवाळीतील धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत दररोज घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लक्ष्मी देवीचे पायांची रांगोळी काढणे शुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते असेही म्हटलं जातं. रांगोळीमध्ये विविध प्रकारची फुले किंवा रंग वापरल्याने आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जेचा अधिक संचार होतो. त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर चांगला परिणाम होतो. दिवाळी तर आवर्जून लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रांगोळी काढली जाते. सध्याच्या काळात मात्र, या परंपरेला स्पर्धेचं रूप आले आहे.
दिवाळीत असणारा लक्ष्मीपूजनचा दिवस खास असून तो मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. लक्ष्मीचा वास आपल्याकडे कायम राहावा म्हणून प्रत्येक घरात लक्ष्मीपूजन केले जाते. दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्व असून त्यासंदर्भातील अनेक कथा, दंतकथा या प्रसिद्ध आहेत. शरद पौर्णिमेच्या दिवशी जे समुद्रमंथन झाले आणि त्यातून लक्ष्मीची निर्मिती झाली असे मानले जाते. शरद पौर्णिमा म्हणजे, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
तर दुसरीकडे दिवाळीचा काळ म्हणजे अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी ही पृथ्वीवर संचार करत असून ती निवासासाठी योग्य असे स्थान शोधते असे म्हणतात. तर काही ठिकाणी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते. असे अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. सुख आणि समृद्धी लाभण्यासाठी दिवाळीला प्रत्येक घरात लक्ष्मीची पूजा केली जाते.
मातीचा दिवा पाच घटकांनी बनलेला असल्यामुळे घर आणि आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिव्यांच्या प्रकाशाने कीर्ती मिळते. यामुळेच दिवाळीच्या दिवशी मातीचे दिवे लावणे शुभ मानले जाते. ( Diwali २०२३ )
हेही वाचलंत का?