नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या शनिवार (दि.22)पासून प्रकाशपर्वाला प्रारंभ होत असून, सध्या घरोघरी दिवाळीनिमित्त फराळ बनविले जात आहेत. शिवाय बाजारातही रेडिमेड फराळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी केली जात असल्याचा आनंद बघावयास मिळत असला तरी, महागाईमुळे खिशाला बसत असलेली झळ फराळाचा गोडवा काहीसा तिखट करीत आहे.
सध्या फराळाचे साहित्य खरेदीसाठी गृहिणींकडून किराणा दुकानांमध्ये गर्दी केली जात आहे. मात्र, किराणा साहित्याचे वाढलेले दर लक्षात घेता, मोजकेच पदार्थ बनविण्याकडे गृहिणींचा कल आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर एक हजाराच्या पार गेल्याने, अगोदरच गृहिणींचे किचन बजेट पूर्णत: कोलमडले आहे. अशात इतर साहित्यांमध्ये झालेली दरवाढ चिंतेत आणखीनच भर घालत आहे. यंदा इतर वस्तूंच्या किमती 20 ते 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या बाजारात रेडिमेड फराळही दाखल झाले आहेत. ज्या कुटुंबामध्ये दोघेही नोकरीनिमित्त घराबाहेर पडतात, अशांना रेडिमेड फराळाचा मोठा आधार असतो. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेडिमेड फराळाचे दर वाढल्याने, खिशाला मोठी झळ बसत आहे. या पदार्थांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पदार्थांच्या दरात पाच ते आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल, डाळी, तूप, साखर अशा सर्वच साहित्यांच्या किमती वाढल्यामुळे फराळाच्या दरांमध्ये वाढ करावी लागल्याचे विक्रेते सांगतात.
यंदा स्पेशल भाजणी चकली 400 ते 500 रुपये किलो, रवा, रवा नारळ, रवा बेसन, बेसन लाडू सुमारे 300 ते 600 रुपये किलो आहेत. चिवडा 250 ते 400 रुपये आहे. शंकरपाळे 350 ते 450 रुपये, साधी शेव 250 रुपये, तर लसूण शेवही 300 रुपये किलो असा दर आहे. सुक्या खोबर्याच्या सारणाची करंजी 500 रुपये किलो, तर अनारसेदेखील 500 रुपये किलोपर्यंत आहे. तर डिंक आणि मेथी लाडू 700 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यात वाढ झाली आहे.
महिलांचे विविध बचतगट, संस्था तसेच घरगुती लघुउद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात रेडिमेड फराळ बाजारात उपलब्ध करून दिला आहे. चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे आदी पदार्थांना ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे विक्रेते सागंतात.