Curry leaves benefits : तुम्ही देखील जेवणातून कढीपत्ता काढून टाकता का? ‘हे’ आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे | पुढारी

Curry leaves benefits : तुम्ही देखील जेवणातून कढीपत्ता काढून टाकता का? 'हे' आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय घरांमधील स्वंयपाकात कढीपत्ता या वनस्पतीची पाने वापरली जातात. कढीपत्याची पाने (Curry leaves benefits) ही औषधी गुणधर्माबरोबरच पदार्थ स्वादिष्ट आणि सुगंधी बनण्यासाठी वापरतात. कडीपत्ता सांबार, रस्सम, चटणी इत्यादी पदार्थांत आवर्जून वापरला जातो, तर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कडीपत्त्याची चटणीदेखील बनवतात.

१०० ग्रॅम कढीपत्त्यामध्ये सुमारे १०८ कॅलरीज असतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई इत्यादी जीवनसत्त्वेही कढीपत्त्यांच्या पानांमध्ये असतात, त्यामुळे कढीपत्त्याचे (Curry leaves benefits) दैनंदिन आहारात पौष्टिक मूल्य अधिक आहे.

Curry leaves benefits: ‘हे’ आहेत कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे

शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट

कढीपत्ता हे संयुगांनी समृद्ध असतात तसेच शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणूनही ओळखला जातो. ही संयुगे आपल्याला निरोगी ठेवतात आणि अनेक रोगांपासून आपले संरक्षण करतात. ही वनस्पती आपल्या शरीराचे ऑक्सिडेटिव्हपासून नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. कढीपत्ता ही वनस्पती मज्जासंस्था, हृदय व रक्तवाहिन्या, मूत्रपिंड इत्यादींच्या आजारांपासून बचाव करतात.

कर्करोगाचा धोका कमी करते

कढीपत्त्यांमध्ये उत्परिवर्तन विरोधी क्षमता असते. ते वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगापासून आपल्या शरीराचे रक्षण करते. कढीपत्त्यातील फ्लेव्होनॉइड्स हा घटक कर्करोगविरोधी एजंट म्हणून काम करतो, जो स्त्रियांच्या स्तनाच्या कर्करोग पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते. कढीपत्ता हे पोटाच्या कॅन्सरपासूनही माणसाला वाचवते. कढीपत्ता आपल्या शरीराला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

हृदयरोगाचा धोका कमी करते

कढीपत्ता शरीराचे ऑक्सिडेटिव्हने होणारे नुकसान रोखून आपल्या हृदयाचे रक्षण करते. कढीपत्त्याचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही नियंत्रित करते, तसेच कढीपत्ता ट्रायग्लिसराइड्सची पातळी देखील कमी करते. यामुळे हृदयाची जोखीम कमी होत, हृदयविकारांपासून संरक्षण मिळते.

मधुमेह व्यवस्थापनात मदत करते

कढीपत्त्याच्या सेवनाने मधुमेह आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंत नियंत्रणास मदत होते. कढीपत्ता रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. कढीपत्त्यामध्ये भरपूर फायबर असल्याने पचन व्यवस्था सुधारते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यास प्रतिबंध होतो. कडीपत्ता मधुमेह असलेल्या रुग्णांना आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

पोटाच्या आजारांवर उपयोगी

कढीपत्ता अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी उपयोगी ठरते. कढीपत्त्यात कार्बाझोल अल्कलॉइड्स असतात जे अतिसार नियंत्रित करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही कढीपत्ता पेस्ट किंवा पानांचा रस काढून तो पिऊ शकता. कढीपत्त्यामध्ये असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या बरे होण्यास मदत होते.

बॅक्टेरिया मारतात

कढीपत्ता बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. ते E.coli आणि Staphylococcus द्वारे जिवाणू संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे मानले जाते.

न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म

कढीपत्त्याच्या सेवनाने आपल्या मेंदूचे संरक्षण करणारे अँटिऑक्सिडंट्स वाढतात. न्यूरॉन्सचे ऑक्सिडेटिव्हपासून संरक्षण करून ते अल्झायमर रोगामध्ये देखील उपयुक्त असल्याचे आढळले आहे. कढीपत्त्याचा स्मृतिभ्रंश (स्मरणशक्ती कमी होणे) आजारामध्येही फायदा झाल्याचे आढळूळ आले आहे.

वजन कमी करण्यास मदत करते

कढीपत्त्यातील अल्कलॉइड्स हा घटक आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. कढीपत्ता डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून देखील कार्य करते. कढीपत्ता आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

केसांसाठी उत्तम

कढीपत्ता नारळाच्या तेलात उकळून ते केसांना लावल्यानंतर ते केसांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट टॉनिक बनते. जे केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते आणि केसांची वाढ होण्यास मदत करते. कडीपत्ता केसांसाठी वापरल्यास ते आपले केस मजबूत करतात आणि केस गळणेही कमी करतात. कडीपत्ता घातलेले तेल कोंडा आणि कोरडे टाळूची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए भरपूर असल्याने मानवी डोळ्यांसाठी ते फायदेशीर ठरते. दृष्टी चांगली राखण्यास आणि मोतीबिंदू वाढीला प्रतिबंध करण्यास कडीपत्ता नेहमीच फायदेशीर ठरतो.

त्वचेसाठी गुणकारी

कढीपत्ता त्वचेवरील सौम्य भाजणे, जखमा आणि त्वचारोगावर आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतो. कडीपत्ता त्वचेला बाह्य संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

Back to top button