

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा
कोरोनाचे संकट कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना प्रचारात आणखी सूट देण्याचा निर्णय आज (रविवार) घेतला. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी ही सूट देण्यात आली आहे. आयोगाने हॉल आणि खुल्या मैदानातील बैठकांना परवानगी दिली आहे, मात्र त्याचवेळी रोड शो, पदयात्रा, सायकल अथवा गाड्यांची रॅली काढण्यावरील बंदी कायम ठेवली आहे.
हॉल आणि खुल्या मैदानातील बैठकांना परवानगी देण्यात आली असली तरी हॉलच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के तर खुल्या मैदानाच्या क्षमतेच्या 30 टक्के लोकच अशा बैठकात सामील होऊ शकतात. राजकीय पक्षांना 20 कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन प्रचार करण्यास मुभा देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
गोवा आणि उत्तराखंड या दोन राज्यात 14 तारखेलाच एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे. पंजाबमध्ये एकाच टप्प्यात 20 तारखेला सर्वच्या सर्व मतदारसंघात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात यावेळी सात टप्प्यात तर मणिपुरमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल.