

पुणे : यंदा राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे 42 तालुके दुष्काळाच्या छायेत असून, या तालुक्यांचे अंतिम सर्व्हेक्षण होणार आहे. स्थानिक प्रशासनाने 'महामदत' मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करून सर्व तालुक्यांतील स्थितीचा अहवाल 17 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ देखरेख समितीमार्फत राज्य शासनाला सादर करावा, अशा सूचना सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांना राज्य शासनाने दिल्या आहेत.
राज्यात एक जून ते 26 ऑगस्ट या काळात सरासरी 772.4 मि. मी. पाऊस पडतो. मात्र, यंदा प्रत्यक्षात 709.5 मि. मी. म्हणजे सरासरीपेक्षा आठ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यात मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 21 टक्के कमी असून, मराठवाड्यात 18 टक्के, तर विदर्भात सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील नांदेड वगळता सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. औरंगाबादमध्ये 33 टक्के, बीडमध्ये 32 टक्के, हिंगोलीत 34 टक्के, जालन्यात 48 टक्के, लातूर 8 टक्के, उस्मानाबाद 23 टक्के आणि परभणीत 25 टक्के कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम खरीप हंगामातील उत्पादनावर झाला आहे.
राज्याच्या महसूल विभागामार्फत 'महामदत' मोबाईल अॅपद्वारे दुष्काळाचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्यातील 15 जिल्ह्यांमधील 42 तालुके दुष्काळाच्या निकषात बसतात. त्यामुळे दुष्काळी स्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे किंवा कसे? असल्यास तीव्रता किती आहे, तो कोणत्या प्रकारात मोडतो, याचा अहवाल 17 ऑक्टोबरपर्यंत शासनाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील एकूण 42 तालुक्यांपैकी तब्बल 20 तालुके हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ सोलापूरमधील पाच, सांगली चार, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ आहे. मराठवाड्यातील 14 तालुके दुष्काळाच्या छायेत असून, त्यात जालना जिल्ह्यातील पाच, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी तीन, छत्रपती संभाजीनगरमधील दोन, तर लातूर जिल्ह्यातील एका तालुक्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा यात समावेश नाही.
नंदूरबार, सिंदखेड, चाळीसगाव, बुलढाणा, लोणार, भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, औरंगाबाद, सोयगाव, मालेगाव, सिन्नर, येवला, शिरूर घोडनदी, मुळशी, दौंड, पुरंदर, वेल्हा, बारामती, इंदापूर, वडवणी, धारूर, आंबेजोगाई, रेणापूर, वाशी, उस्मानाबाद, लोहार, करमाळा, माढा, बार्शी, माळशीरस, सांगोला, वाई, खंडाळा, हातकणंगले, गडहिंग्लज, शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती आहे.
हेही वाचा