महिला : अरबकन्यांचा प्रेरणादायी लढा

महिला : अरबकन्यांचा प्रेरणादायी लढा
Published on
Updated on

यंदाच्या नोबेल पुरस्कारांमध्ये इराणमधील सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. शिरीन एबादी या शांततेचे नोबेल मिळवणार्‍या पहिल्या महिला होत्या. 2014 मध्ये मलालाच्या रूपाने इस्लामिक देशातील एका मुस्लिम तरुणीला शांततेचे नोबेल मिळाले. त्यापूर्वी 'अरब स्प्रिंग'मधील आघाडीची पत्रकार तवक्कुल करमनची यासाठी निवड करण्यात आली होती. एकविसाव्या शतकात जागतिक शांततेचे नोबेल मिळालेल्या या अरबकन्यांचा लढा जगासाठी उद्बोधक आणि प्रेरणादायी आहे.

यंदाच्या नोबेल पुरस्कारांमध्ये महिलांचा झालेला सन्मान, हा नारीशक्तीच्या बदलत्या अभिव्यक्तीचे आणि तिच्यातील सामर्थ्यशीलतेचे द्योतक आहे. त्याचबरोबर बदलत्या आणि आधुनिक जगाला स्त्रियांमधील प्रतिभेची, नियोजनकौशल्याची, अर्थजाणिवांची, शांततावादाची, सामाजिकतेची दखल घेण्याचा इशारावजा संदेशही दिला आहे. अर्थशास्त्राचे नोबेल असेल, साहित्यातील नोबेल असेल किंवा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार असेल, भौतिकशास्त्रातले नोबेल असेल, या सर्वांमध्ये स्त्रियांची वर्णी लागणे ही महिला सक्षमीकरणाच्या आणि स्त्रीस्वातंत्र्याच्या जगभरात सुरू असलेल्या लढ्याला, चळवळींना प्रेरणारी देणारी घडामोड म्हणावी लागेल.

नोबेल हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान मानला जात असल्याने यातील प्रत्येक क्षेत्रातील पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, संपूर्ण जगभरातील कार्यांचा, प्रतिभावंतांचा, अभ्यासकांचा धांडोळा घेऊन त्यातून या पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तीची निवड केली जाते. तसे पाहिले, तर हे काम गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखे किंवा अथांग समुद्रातून एखादी छोटी वस्तू शोधण्याइतकेच महाकठीण; पण नोबेल समितीकडून ते वर्षानुवर्षे पार पाडले जात आहे. या पुरस्कारांसाठीची निवड ही राष्ट्र, जात-पंथ, लिंग अशा कोणत्याही भेदाभेदांविना केली जात असल्याने त्यांचे महत्त्व अधिक आहे. नोबेलचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास पाहिल्यास या पुरस्कारांमध्ये महिलांची संख्या वाढत गेल्याचे दिसून येईल. पर्ल बुक, मेरी क्युरी, मदर तेरेसा, इलिनोर ऑस्ट्रॉम अशा 50 हून अधिक महिलांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 1901 ते 2016 या कालावधीत अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक 49 वेळा महिलांना देण्यात आले आहे. मेरी क्युरी या नोबेल इतिहासातील एकमेव अशा महिला आहेत ज्यांना दोनवेळा हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला.

स्त्रियांना कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, हे आज एकविसाव्या शतकातही आपण पाहत आहोत. विकसनशील आणि विकसित राष्ट्रांमध्ये शिक्षणाचे लोकशाहीकरण झाल्यामुळे आणि आधुनिकता आल्यामुळे महिलांकडे पाहण्याची मध्ययुगीन मानसिकता बर्‍याच प्रमाणात बदलली आहे. तथापि, इस्लामिक देशांमध्ये आजही महिलांची स्थिती ही भीषण, करुण आणि केविलवाणी आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात यासारख्या देशांमध्ये स्त्रीस्वातंत्र्याचे वारे वाहत असले, तरी अन्य अरब राष्ट्रांमध्ये स्त्रियांना आजही अनन्वित अत्याचारांचा सामना करावा लागतो.

याचे ताजे उदाहरण म्हणजे, यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झालेल्या नर्गिस मोहम्मदी. इराणमधील महिलामुक्तीचा लढा उभे जग पाहत आहे. तिथे महिलांवर अगणित अत्याचार आणि बंधने लादण्यात आली आहेत. हिजाब, बुरखाविरोधात तिथे मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. लांबसडक केस कापून त्यांनी यापूर्वीच सरकारचा निषेध केला आहे. या सर्व लढ्यात नर्गिस मोहम्मदी या आघाडीवर होत्या. एक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नर्गिस यांनी इराणमधील महिलामुक्तीच्या क्षेत्रात केलेले कार्य अजोड आहे.

या अतुलनीय साहसाबद्दल आणि महिलांसाठी उभारलेल्या लढ्याबद्दल त्यांना यंदा शांततेचे नोबेल देऊन गौरवण्यात आले आहे. महिलांसाठी मोठा लढा उभारताना नर्गिस यांना अनंत यातना सहन कराव्या लागल्या. त्यांना अनेकदा तुरुंगात डांबण्यात आले. कुटुंबीयांपासून त्यांना दूर लोटण्यात आले. आतापर्यंत 13 वेळा अटक आणि 31 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांना 154 फटक्यांची शिक्षाही सुनावण्यात आली होती. विशेष म्हणजे, आजही त्या तुरुंगातच आहेत. भौतिकशास्त्रात करिअर करणार्‍या नर्गिस यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून, स्थानिक आणि परदेशी वृत्तपत्रांसाठी त्या नियमित लेखन करत होत्या. त्यानंतर त्या महिलांवरील अत्याचार आणि दडपशाहीविरोधात पुढे आल्या. नर्गिस यांनी 'व्हाईट टॉर्चर' नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी तुरुंगातील आपले अनुभव आणि इतर कैद्यांच्या कथा लिहिल्या आहेत.

नर्गिस यांच्यापूर्वी 2014 मध्ये मलाला युसूफझाई या 17 वर्षीय मुस्लिम तरुणीला शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. मलालाची कहाणी नर्गिस यांच्यापेक्षाही अतिशय हृदयद्रावक होती. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात येथे जन्मलेल्या मलालाला आठवी इयत्तेत शिकत असल्यापासून संघर्ष करावा लागला. 2007 ते 2009 या काळात तालिबानने स्वात खोर्‍यावर कब्जा केला होता. तालिबानच्या भीतीने खोर्‍यातील लोकांनी मुलींना शाळेत पाठवणे बंद केले आणि 400 हून अधिक शाळा बंद झाल्या. यामध्ये मलाला हिच्या शाळेचाही समावेश होता. वास्तविक, ती अभ्यासात हुशार होती. त्यामुळे मलालाचे वडील अभ्यासासाठी तिला घेऊन पेशावरला गेले.

तिथे वयाच्या 11 व्या वर्षी राष्ट्रीय माध्यमांना 'हाऊ डेअर द तालिबान टेक अवे माय बेसिक राईट टू एज्युकेशन' या शीर्षकाचे प्रसिद्ध भाषण दिले होते. या घटनेने मलालाचे आयुष्यच बदलून गेले. तालिबानने आपले आणि आपल्या मैत्रिणींचे बालपण आणि शाळा हिसकावून घेतल्याचा मलालाला इतका धक्का बसला की, तिने 2009 पासून 'बीबीसी'साठी 'गुल मकाई' या नावाने एक डायरी लिहिली. यामध्ये तिने स्वात खोर्‍यातील तालिबानच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला. यामध्ये तिने नमूद केले होते की, टी.व्ही. पाहण्यावर बंदी असल्याने ती तिची आवडती भारतीय मालिका 'राजा की आयेगी बारात' पाहू शकत नाही. यामुळे तालिबान संतप्त झाले. संतप्त तालिबानी दहशतवाद्यांनी 9 ऑक्टोबर 2012 रोजी मलाला हिच्या स्कूल बसवर कब्जा केला होता.

बसमध्ये चढताना दहशतवाद्यांनी मलाला कोण आहे, असे विचारण्यास सुरुवात केली. सर्व मुले मलालाकडे शांतपणे पाहू लागली. अखेर दहशतवाद्यांनी मलालाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी मलाला हिला उपचारांसाठी ब्रिटनला नेण्यात आले. तिच्या आरोग्यासाठी संपूर्ण जगाने प्रार्थना केली आणि अखेर मलाला तेथून बरी होऊन आपल्या देशात परतली आणि आपले कार्य पुढे सुरू ठेवले. तिच्या या कार्याची दखल घेत मलालाला शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली. जगभरात शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने मलालाने 'मलाला फंड' या ट्रस्टची स्थापना केली आहे. तिच्या निडर आणि महत्त्वाच्या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्राने मलालाला 'शांतिदूत' हा पुरस्कार घोषित केला आहे.

मुस्लिम महिलांमध्ये पहिला नोबेल पुरस्कार शिरीन एबादी या इराणी वकील महिलेला मिळाला होता. माजी न्यायाधीश आणि मानवाधिकार कार्यकर्ते आणि इराणमधील मानवाधिकार केंद्राच्या रक्षक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत लक्षवेधी राहिली. त्या इराणमधील पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. 1975 मध्ये त्या तेहरान शहर न्यायालयाच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. त्यांना 2003 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. नोबेल पारितोषिक मिळवणार्‍या त्या पहिल्या मुस्लिम महिला होत्या.

इराणमधील आघाडीच्या मानवाधिकार कार्यकर्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात. इबादी यांचा जन्म हमादान येथे एका सुशिक्षित इराणी कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोहम्मद अली इबादी हे शहराचे मुख्य नोटरी आणि कायद्याचे प्राध्यापक होते. त्यांच्या लोकशाही कार्याबरोबरच मानवी हक्क, विशेषतः महिला, मुले आणि शरणार्थींच्या हक्कांविषयीच्या लक्षणीय मूलभूत कार्याची दखल घेत नोबेल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. शिरीन यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर इराणमध्ये संमिश्र प्रतिसाद उमटला होता. पुराणमतवादी समाजमाध्यमांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. इराणचे तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद खातामी यांनी हे पारितोषिक राजकीय असल्याची टीका केली होती. इराणमधील 1979 च्या क्रांतीनंतर पुराणमतवादी मौलवींच्या आग्रहामुळे एबादी यांची पदावनती करण्यात आली. तेथील मौलवींनी असा आग्रह धरला की, इस्लाममध्ये महिलांना न्यायाधीश होण्याला बंदी आहे.

शिरीन आणि इतर महिला न्यायाधीशांनी याचा निषेध केला; पण परिस्थिती कायम राहिल्याने त्यांनी अखेरीस लवकर निवृत्ती व्हावी म्हणून विनंती केली. वारंवार त्यांचे अर्ज नाकारल्यामुळे कायद्याची पदवी असूनही 1993 पर्यंत त्या वकिली करू शकल्या नाहीत; पण या फावल्या वेळेचा उपयोग त्यांनी पुस्तके आणि इराणी नियतकालिकांमध्ये लेख लिहिण्यासाठी केला. 2004 पर्यंत इराणमध्ये वकिली करत असताना त्या तेहरान विद्यापीठात कायदा विषय शिकवीत होत्या. मुले आणि महिलांची कायदेशीर स्थिती मजबूत करण्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली. नोबेल निवड समितीने एक 'धाडसी व्यक्ती' म्हणून त्यांचे कौतुक केले. कारण, त्यांनी स्वतःच्या सुरक्षेचा प्रश्न बिकट असतानाही त्या धमक्यांकडे दुर्लक्ष करत आपले कार्य सुरू ठेवले. शिरीन यांनी पारितोषिक स्वीकारताना केस झाकले नाहीत, यावरूनही टीका झाली होती. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी विविध देशांमध्ये व्याख्याने दिली. तसेच त्यांनी इराणमध्ये राजकीय गुन्ह्याचे आरोप असणार्‍यांना कायद्याची मदत केली. शांती, न्याय आणि महिला समतेसाठीचे त्यांचे कार्य उल्लेखनीय होते.

जागतिक शांततेसाठी विभागीय पातळीवर मोलाचे योगदान देणार्‍या अरबकन्यांमध्ये तवक्कुल करमन यांचाही उल्लेख करावा लागेल. 2011 सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. तवक्कुल ही येमेनमधील एक धडाडीची पत्रकार तरुणी. जगभरात गाजलेल्या 'अरब स्प्रिंग'मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या तवक्कुलला 'मदर ऑफ रिव्हॉल्युशन', 'आयर्न वूमन' म्हणूनही ओळखले जाते. नोबेल शांतता पारितोषिक जिंकणारी करमन ही पहिली अरब महिला आणि दुसरी मुस्लिम महिला ठरली.

येमेनसारख्या पुरुषप्रधान आणि मागासलेल्या देशात दिवंगत राष्ट्राध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्या सुरुवातीच्या काळात हजारो येमेनींना एकत्र आणणार्‍या या तरुणीने तिच्या निर्भीड नेतृत्वानेे जगाचे आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. येेमेनमध्ये शांतता नांदावी, यासाठी तिने केलेले कार्य जागतिक पटलावर चर्चेचा विषय ठरले. 22 जानेवारी 2010 रोजी तीन साध्या वेशातील पुरुषांनी पोलिस असल्याचे सांगत तिचे अपहरण केले आणि तुरुंगात नेण्यात आले. त्याच क्षणी, तवक्कुलला समजले की, तिच्या शांततापूर्ण निषेधाने राजवट कशी घाबरली आहे. तिच्या अटकेमुळे देशभरात निदर्शने सुरू झाली.

आपल्याला मिळालेल्या सामाजिक आणि राजकीय पाठिंब्यामुळे तिचे धैर्य आणखी वाढले. राजकीय आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असलेल्या तवक्कुलने येमेनची राजधानी साना येथील चेंज स्क्वेअरमध्ये तंबूत नऊ महिने घालवले. न्याय आणि स्वातंत्र्यासाठी शांततापूर्ण आंदोलनांचे नेतृत्व करत राहिली. तवक्कुलने आपल्या डोळ्यांनी सरकारी सैन्याने आणि स्नायपर्सने तिच्या क्रांतिकारक मित्रांची हत्या करताना पाहिले होते; पण ती घाबरली नाही. तिच्या प्रदीर्घ शांततापूर्ण संघर्षाने 32 वर्षांच्या हुकूमशाही आणि भ्रष्ट शासनाला पदच्युत व्हावे लागले. अहिंसक प्रतिकारासाठी तवक्कुल लहानपणापासूनच लक्षवेधी ठरायची.

शाळेत विद्यार्थ्यांच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात तिने अनेक आंदोलने आयोजित केली होती. पुढे 2007 मध्ये येमेनी वृत्तपत्रांमध्ये लेख प्रकाशित करून देशातील अन्याय आणि नागरी हक्कांचे उल्लंघन याबद्दल जनप्रबोधन करण्यास सुरुवात केली. 2010 मध्ये एका निदर्शनात एका महिलेने तिच्यावर जांबियाने वार करण्याचा प्रयत्न केला; परंतु करमनच्या समर्थकांनी हल्ला थांबवण्यात यश मिळवले. तवक्कुल आजही मानवतेचा संदेश जगाला देत आहे. विविध संस्कृती, धर्म आणि राजकारण यांच्यात सहअस्तित्वाची तिची मागणी राहिली आहे. हुकूमशाही आणि दडपशाहीविरुद्ध निग्रही, ठाम भूमिकेमुळे ती 'अरब स्प्रिंग'ची प्रणेती ठरली.

एकविसाव्या शतकात जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या या अरबकन्यांचा शांततावाद जगासाठी उद्बोधक आणि प्रेरणादायी आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यात महिलांची खूप महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तथापि, बदलत्या काळात इस्लामिक जगताने आणि वैश्विक समुदायाने या नोबेल विजेत्या मुस्लिम महिलांंनी शिकवलेल्या आणि अंमलात आणलेल्या शांतता शिक्षणाच्या मुद्द्यांवर मंथन करणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news