पिंपरी : सततच्या बंदोबस्तामुळे पोलीसांचे कंबरडे मोडले; मनुष्यबळाची सुद्धा कमतरता

पिंपरी : सततच्या बंदोबस्तामुळे पोलीसांचे कंबरडे मोडले; मनुष्यबळाची सुद्धा कमतरता
Published on
Updated on

पिंपरी : संतोष शिंदे 

एसटीतील कामगारांचा संप, पोलिस भरती परीक्षा आणि त्यानंतर आता आळंदी, देहू येथे कार्तिकीनिमित्त पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरवण्यात आला आहे. कार्तिकी बंदोबस्तातून थोडा दिलासा मिळतो ना तोच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त देण्याचे नियोजित आहे.

तसेच, आगामी 27 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी देखील पोलिसांचे मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे अपुर्‍या मनुष्यबळावर दैनंदिन कामाचे नियोजन करताना उच्चपदस्थांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे शहर पोलिस आणि ग्रामीण पोलिसांचा भाग तोडून पिंपरी- चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. मात्र, तीन वर्षानंतरही पिंपरी- चिंचवड पोलिसांसमोर अपुर्‍या मनुष्यबळाची समस्या कायम आहे.

शहरात रोजगाराच्या शोधात देशभरातून लोंढे शहरात दाखल झाले आहेत. महापालिकेच्या नोंदीनुसार शहराची लोकसंख्या केवळ साडेबावीस लाख इतकी आहे. प्रत्यक्षात मात्र 60 ते 70 लाख इतकी मोठी लोकसंख्या आयुक्तालयाच्या अखत्यारित येते. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाची हद्द सुमारे 500 चौरस किलोमीटर इतकी आहे.

असे असताना अलीकडे काही दिवसांपासून लागोपाठ मोठे बंदोबस्त येत आहेत. पोलिस भरती परीक्षेसाठी पाच जिल्ह्यांमध्ये पिंपरी- चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यातून दिलासा मिळतो ना तोच एसटी संपामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे होती. त्यामुळे पुन्हा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

त्यानंतर लगेचच कार्तिकी यात्रा आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी आणि देहू परिसरात दाखल झालेल्या वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

सलग चार दिवस म्हणजेच 4 डिसेंबर पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. याठिकाणी 6 सहायक आयुक्त, 36 पोलिस निरीक्षक, 100 सहायक पोलिस निरीक्षक/ उपनिरीक्षक, 975 कर्मचारी असा मोठा बंदोबस्त देण्यात आला आहे.

हा मोठा बंदोबस्त संपला की लगेचच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बंदोबस्त द्यावा लागणार आहे. तसेच, आगामी 27 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तेथे देखील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.

मैदानी चाचणी मोठा बंदोबस्त

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 720 जागांसाठी 19 नोव्हेंबरला लेखी परीक्षा घेण्यात आली. सहा जिल्ह्यातील एकूण 444 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा देण्यात आली. यामध्ये उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांना गुणांच्या मेरिटनुसार मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. उत्तीर्ण होणार्‍या उमेदवारांच्या एकास दहा प्रमाणे विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत. त्यामुळे चाचणीसाठी देखील मोठा बंदोबस्त द्यावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news