वसंत पाटणकर यांना डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार जाहीर - पुढारी

वसंत पाटणकर यांना डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार जाहीर

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

शिवाजी विद्यापीठाच्यावतीने दिला जाणारा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक, कवी, प्रा.वसंत पाटणकर यांना जाहीर झाला आहे. ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते २९ जानेवारी, २०२२ रोजी पुरस्कार वितरण होणार असल्याचे कुलगुरू प्रा.(डॉ). डी. टी. शिर्के यांनी सांगितले.

नामवंत समीक्षक,अनुवादक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. म. सु. पाटील यांच्या कार्याची स्मृती म्हणून डॉ.म. सु. पाटील यांच्या नावे हा पुरस्कार प्रति दोन वर्षांनी दिला जातो. पाटील यांच्या कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना पहिल्या डॉ. म. सु. पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, यावर्षी प्रा.वसंत पाटणकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रा.वसंत पाटणकर यांचे मराठी समीक्षा लेखनातील योगदान भरीव स्वरूपाचे आहे. वसंत पाटणकर हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातून प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले आहेत. ‘विजनातील कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. कविता या साहित्य प्रकाराची तात्त्विक व उपयोजित समीक्षा त्यांनी लिहिली.

‘कविता : संकल्पना, निर्मिती आणि समीक्षा’ व ‘कवितेचा शोध’ या ग्रंथातील त्यांची समीक्षा मौलिक ठरली आहे. कविता या साहित्यप्रकाराची शिस्तशीर व सुसंगत अशी नवी व्यवस्था त्यांनी लावली. त्यांच्या समीक्षा लेखनात कविता आणि उपप्रकारांचा संगतवार विचार आहे. काव्यसमीक्षक म्हणून वसंत पाटणकर यांची विशेष ओळख आहे. आधुनिक मराठी काव्याची त्यांची समीक्षा महत्त्वाची ठरली. कविता या साहित्यप्रकाराविषयीची आस्था, जिव्हाळा आणि आधुनिक मराठी काव्याची मर्मदृष्टी त्यांच्या लेखनात आढळून येते.कवी ग्रेस व नामदेव ढसाळ या कवींबरोबरच १९६० नंतरच्या मराठी कवितेची त्यांची समीक्षा साक्षेपी व चिकित्सक ठरली आहे. याबरोबरच ग.स. भाटे, द.ग.गोडसे, अरूण कोलटकर यांच्यावरील त्यांची संपादने महत्त्वाची ठरली आहेत. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार निवड समितीचे सदस्य म्हणून रंगनाथ पठारे, डॉ.राजन गवस व डॉ.अविनाश सप्रे यांनी काम पाहिले.

हेही वाचा : 

Back to top button