पुणे : चक्क इनक्यूबेटरमध्ये मोरांचा जन्म; देशातील पहिलीच घटना | पुढारी

पुणे : चक्क इनक्यूबेटरमध्ये मोरांचा जन्म; देशातील पहिलीच घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा

अंडी उबवण केंद्रात (इनक्यूबेटर) कोंबडीच्या अंड्यांना कृत्रिमरित्या उबवून पिलांचा जन्म होतो हे आपल्याला माहीत आहे. पण, अशा अंडी उबवण केंद्रात प्रथमच लांडोरीच्या अंड्यांपासून चार मोरांच्या पिल्लांचा जन्म झाल्याची देशातील पहिली घटना महाराष्ट्रात घडली आहे.

महाराष्ट्र वनविभाग आणि इला फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येणार्‍या पिंगोरी येथील ‘इला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’ मध्ये ही किमया करण्यात या सेंटरला यश आले . कृत्रिम अंडी उबवण केंद्रात मोरांना जन्म देण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याची माहिती या केंद्राने दिली आहे.

विणीच्या हंगामात लांडोर फार सावध असतात. त्या शेताच्या बांधावर, माळरानावर अंडी घालतात. तसेच त्या काटेरी वनस्पतींमध्येही हे अंडे लपवतात. जर ते अंडे नागरिकांना सापडले किंवा त्यांना त्रास झाला तर लांडोर ते अंडी सोडूनही देतात. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत मोर पक्षाचे अंडी हाताळण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

बहुतांश वेळा लांडोरीची अंडी सापडल्याने सहानुभूतीच्या भावनेतून लोक अंडी वाचवतात आणि ते उबवण्यासाठी घरच्या कोंबडीखाली ठेवतात. कोंबड्याही त्या अंडी उबवतात परंतू, या अंड्यांचा आकार मोठा असल्याने ते योग्य रितीने उबवले जात नाही. तसेच त्याचा आकार न जुळल्यामुळे, बहुतेक वेळा लांडोरीची अंडी उबवली न जाता ती निकामी होतात. त्यामुळे कायद्यानेही असे करण्यास परवानगी नाही. दरम्यान, इला फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी इला ट्रांझिट सेंटर येथे कृतिमरित्या उबवण पेटीमध्ये (इनक्यूबेटर) ही अंडी ठेवली आणि त्यातून मोरांना जन्म देण्यात यश मिळवले आहे. मोरांचे अंडी उबवण्याबाबतचे हे एक अधिकृत इन्क्युबेशन सेंटर आहे.

आम्हाला आनंद आहे की आम्हाला या अंडी उबवण केंद्रात चार मोराची अंडी पूर्णपणे उबवण्यात यश आले आहे. हे भारतात प्रथमच घडले आहे. नागरिकांना आमचे आवाहन आहे की, अशाप्रकारे अंडी शेतात आढळून आल्यानंतर त्यांनी वनविभाग किंवा आमच्याशी संपर्क करा, स्वतः अंडी हाताळू नका.

– डॉ. सतीश पांडे

संचालक, इला फाऊंडेशन

हेही वाचा

Back to top button