

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
COVID19 : भारतात कोरोना संसर्गाचा नवीन व्हेरियंट 'ओमायक्रॉन'चा धोका वाढत असताना एक दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात केवळ ०.२८ टक्केच सक्रिय कोरोनाबाधित शिल्लक असल्याची माहिती सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. शिवाय देशातील ५० टक्के पात्र लोकसंख्येचे लसीकरण पुर्ण झाले आहे. दैनंदिन कोरोनारुग्ण संख्येच्या वाढीचा वेग देखील मंदावला आहे.
रविवारी दिवसभरात ८ हजार ३०६ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, २११ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान ८ हजार ८३४ रूग्णांनी कोरोनावर मात केली. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.३५ टक्के नोंदवण्यात आला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४६ लाख ४१ हजार ५६१ झाली आहे. यातील ३ कोटी ४० लाख ६९ हजार ६०८ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ९८ हजार ४१६ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तब्बल ५५२ दिवसांनी सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत निच्चांकी घट नोंदवण्यात आली आहे.
दुदैवाने आतापर्यंत ४ लाख ७३ हजार ५३७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सोमवारी देशाचा दैनंदिन कोरोना संसर्ग दर ०.९४ टक्के, तर आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.७८ टक्के नोंदवण्यात आला. देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत लसीचे १२७.९३ कोटी डोस लावण्यात आले आहेत. यातील २४.५५ लाख डोस रविवारी दिवसभरात लावण्यात आल्याची महिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १ अब्ज ३९ कोटी २ लाख ६० हजार ७९० डोस पुरवण्यात आले आहेत. यातील २१ कोटी ६ लाख ५० हजार ८६६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ६४ कोटी ८२ लाख ५९ हजार ६७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ८ लाख ८६ हजार २६३ तपासण्या रविवारी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
भारताच्या लसीकरण मोहिमेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारतातील पात्र लोकसंख्येपैकी ५० टक्के पेक्षा जास्त लोकांचे आता पूर्णपणे लसीकरण झाले आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी ही गती कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.सोबतच मास्क, सुरक्षित अंतर राखण्यासह इतर सर्व कोरोना संबंधित नियमांचे पालन करीत राहणे आवश्यक असल्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांच्या ट्विटला उत्तर देताना केले आहे.