

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भायखळा येथील विरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग) मधील पेग्विन पिल्लाला इंग्रजी नाव ठेवण्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पालिकेवर टीका केली. यावरुन महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच संतापल्या असून आपल्याला ऑस्कर पुरस्कार चालतो, मग ऑस्कर नाव का चालत नाही? असा सवाल करत, येणार्या काळात हत्तीच्या पिल्लाचे चंपा तर माकडाचे नाव चिवा ठेवू असाच जोरदार टोलाही लगावला. (Shiv Sena vs BJP)
राणीबागेतील पेग्विन पिल्लाचे आँस्कर असे नाव ठेवण्यात आले आहे. यांचा नामकरण सोहळा महापौर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव, युवराजांच्या पेग्विनचे नाव मात्र इंग्रजीत असा खोचक टोला लगावला होता. त्यामुळे महापौर चांगल्या संतापल्या आहेत. भाजपला वाटते ना मराठी नाव ठेवायला हवी, मग पुढच्या वेळी हत्तीच्या पिल्लाला चंपा तर, एक माकडाचे पिल्लू जन्माला येणार आहे त्याचे चिवा नाव ठेऊ, केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणे सोडा, असा सल्लाही महापौरांनी वाघ यांना दिला. (Shiv Sena vs BJP)
मुंबईच्या मध्यमवर्गीय माणसांना परदेशासारख्या वातावरणाचा अनुभव घेऊ द्या ना, यांची नक्की पोटदुखी काय आहे, टीका करून फक्त चमकायच असते, तुम्हाला ऑस्कर पुरस्कार चालतो. मग ऑस्कर नाव का नाही, असा सवालही महापौर यांनी यावेळी केला. (Shiv Sena vs BJP)
राणीबागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत 106 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी, अशी मागणी भाजपचे कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा, मुंबई महापालिकेतील भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी केली आहे. निविदा देण्याची एक प्रक्रिया असते. केवळ दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. कोटेचा यांनी अभ्यास करून घोटाळा काढावा. कारण नसताना आरोप करू नका, असा टोला महापौर यांनी लगावला. (Shiv Sena vs BJP)