पुढारी ऑनलाईन डेस्क
अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी Why i Killled Gandhi या चित्रपटात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या चित्रपटातून गोडसेचं उदात्तीकरण झाल्यास विरोध केला जाईल अशी भूमिका अगोदरच काही गांधीवाद्यांनी घेतली आहे.
Why i Killled Gandhi हा OTT प्लॅटफॉर्मवर ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदारही आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेने ते राज्यातील घराघरात पोहोचले आहेत.
नथुराम गोडसेची भूमिका कोल्हे यांनी साकारल्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या संदर्भात त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, मी हा चित्रपट २०१७ मध्ये स्वीकारला होता. त्यावेळी मी कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधीत्व करत नव्हतो. एक कलाकार म्हणून मला स्वातंत्र्य आहे आणि राजकीय स्वातंत्र्य वेगळे असल्याने याची गल्लत करू नये असे ते म्हणाले. या चित्रपटात काय आहे ते चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समजणार असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, एखादी भूमिका केल्याने त्या विचारधारेशी १०० टक्के सहमती आहे असे होत नाही. विचारधारेशी सहमत नसतानाही भूमिका करतो. गांधी यांच्या हत्येच्या संदर्भात समर्थन देणारी कोणतीही भूमिका घेतलेली नसल्याचे ते म्हणाले. कलाकार आणि राजकीय भुमिकेमध्ये गल्लत केली जाऊ नये, अशी माझी अपेक्षा असून सुजाण नागरिक ही गोष्ट स्वीकारतील अशी आशा असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचलं का ?