

केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. गेल्या तीन वर्षांपासून ते सल्लागार होते. यापुढील काळात संशोधनाच्या क्षेत्रात काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
सुब्रमण्यम यांनी ट्विट करून सांगितले की, मी माझा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यानंतर शिक्षण क्षेत्रात जाऊन संशोधन करण्याचा मानस आहे. देशाची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. मला प्रचंड प्रोत्साहन आणि समर्थन मिळाले. माझ्या व्यावसायिक जीवनाच्या तीन दशकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रेरणादायी नेता मिळाला नाही. त्यांना आर्थिक विषयातील खोल माहिती आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचा दृढ संकल्प आहे.'
सुब्रमण्यम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे आभार मानले आहेत.
५० वर्षीय के. व्ही. सुब्रमण्यम सेबी, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तज्ज्ञ समितीत होते. तसेच जेपी मॉर्गन चेस, आयसीआयसीआय बँक, टाटा कन्सल्टन्सीमध्येही ते कार्यरत होते.
सुब्रमण्यम यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या आर्थिक सल्लागाराची घोषणा केलेली नाही. याआधीचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची सुत्रे के. व्ही. सुब्रमण्यम यांनी घेतली होती. दरम्यानच्या पाच महिन्यांच्या काळात हे पद रिक्त होते.
१६ ऑक्टोबर, २०१४ रोजी सुब्रमण्यन यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली मात्र, त्यांनी २०१८ मध्ये राजीनामा देत आपण अमेरिकेला जात असल्याचे कारण सांगितले. आपण कौटुंबीक कारणांमुळे हे पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा :