येड्यावानी करतंय गाण्याचं पावसात नॉनस्टॉप ३६ तास शूटिंग (VIDEO) | पुढारी

येड्यावानी करतंय गाण्याचं पावसात नॉनस्टॉप ३६ तास शूटिंग (VIDEO)

पुढारी ऑनलाईन :

गाण्यामध्ये रोमान्स फुलवायचं काम करणारा पाऊस त्याचं गाण्याच्या शूटिंगच्या टिमला मात्र किती त्रासदायक ठरू शकतो त्याचं उत्तम उदाहरण नादखुळा म्युझिकचं येड्यावानी करतंय हे नुकतंच रिलीज झालेलं गाणं. येड्यावानी करतंय हे गावरान बाजाचं रोमँटिक गाणं तुम्हालाही नक्कीचं आवडेल.

या गाण्याची निर्मिती निखिल नमीत आणि प्रशांत नाकती यांची आहे. अभिजीत दानी दिग्दर्शित हे गाणं संजु राठोड आणि जी स्पार्क यांनी संगीतबध्द केलंय. जु राठोड आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलंय. हे गाणं श्रध्दा पवार आणि नील चव्हाणवर चित्रीत झालंय.

गाण्याचं चित्रीकरण इगतपुरी जवळच्या एका गावात केलंय. पहिल्या प्रेमावरचं गावरान गाणं असल्याने हिरव्याकंच शेतामध्ये पावसाळ्यात हे गाणं चित्रीत करायचं ठरलं. पण पावसानेच शूटिंगमध्ये खोळंबा केला. ३६ तास ब्रेक न घेता टिमला हे गाणं शूट करावं लागलं.

याविषयी दिग्दर्शक अभिजीत दानी म्हणतात,”नवोदित कलाकारांची टिम असल्याने रिटेक होईल म्हणून सकाळी चारची शिफ्ट लावली. पण जणू पावसाने आमची परीक्षाच घ्यायचं ठरवलं होतं. पावसाने त्यादिवशी उसंतच घेतली नाही. मग उघड्या रानात शूटिंग पूर्ण करताना आमचे नाकीनऊ आले.

अख्खा दिवस, अख्खी रात्र जागलो. दुसऱ्या दिवशीही असं करून ३६ तासात गाणं पूर्ण केलं. यात आमच्या युवा कलाकारांचा जोश कामी आला. आणि आता ही येड्यावानी केलेली मेहनत फळाला आलेली आहे.”

निर्माते निखील नमीत आणि प्रशांत नाकती म्हणतात-

नादखुळा म्युझिक सुरू करताना नव्या टॅलेंटला व्यासपीठ देण्याचा आमचा संकल्प होता. संजू राठोड ह्या जळगावच्या टॅलेंटेड संगीतकार, गायकाला आम्ही ह्या गाण्यातून संधी दिलीय. अशाच नवनव्या कलाकारांना आपली क्षमता सिध्द करायची संधी नादखुळा म्युझिक सातत्याने देत राहिल.

संजु राठोडने गाण्याचे बोल लिहिले आहेत. संगीत दिले आणि हे गाणे गायलेही आहे. गीतकार, संगीतकार, गायक संजु राठोड म्हणतो- “माझी आत्तापर्यंतची सर्व गाणी ही शहरी बाजाची होती. गावरान बाजाचं एखादं गाणं करावं अशी इच्छा होती. बोल सुचले आणि गाणं तयार झालं. एकदा प्रशांतदादाला ऐकवलं. त्याला ते एवढं आवडलं की, प्रशांतदादा आणि निखीलदादाने लगेच निर्मिती करायचं ठरवलं.

शूटिंगपूर्वी हे फक्त मुलावर गाणे होते. पण शूटिंग दरम्यान त्यात मुलीच्या भावनाही प्रकट झाल्या पाहिजेत. हे लक्षात आल्याने लगेच गाण्यात बदल केले. त्यामुळे सोनाली सोनावणेला अॅप्रोच केलं.”

गायिका सोनाली सोनावणेने गायलेलं गाणं श्रध्दा पवारवर चित्रीत झालंय. श्रध्दा आणि सोनालीचं हे एकत्र पाचवं गाणं आहे. सोनाली सोनावणे म्हणते, “माझा आवाज श्रध्दावर ऑनस्क्रीन चांगला सूट होतो असं मला वाटतं. या प्रोफेशनल जर्नीमधून मला श्रध्दा ही एक बेस्ट फ्रेंड मिळाली. मी गायलेल्या गाण्यावर जेव्हा ती ॲक्टिंग करते. तेव्हा मला खूप आनंद होतो. श्रध्दाच्या चेहऱ्यातीली निरागसता या गाण्यातून उत्तमरितीने झळकलीय.

संजु राठोडसाठी मी याअगोदरही तीन गाणी गायली आहेत. हे गाणं संजुने ऐकवताच मला ते खूप आवडलं होतं. आत्तापर्यंत संजूने संगीतबध्द केलेल्या सर्व गाण्यांमधलं माझं हे सर्वात आवडतं गाणं आहे. संजूच्या गाण्याची खासियत आहे की त्याची गाणी ही युवा पिढीला खूप रिलेटेबेल असतात.

श्रध्दा पवारची सोशल मीडियावर चांगलीच फॉलोविंग आहे. श्रध्दा म्हणते, येड्यावानी करतंय हे गाणं माझ्यासाठी खूप खास होतं. एक तर, हे माझं पहिलं गाणं त्यात प्रचंड पावसात शूटिंग करताना चेहऱ्यावर रोमँटिक भाव द्यायचे. हे अवघडच काम होतं. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणून मोबाईल कॅमेरा फेस करणं. शूटिंगचा कॅमेरा फेस करणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात. मला अभिनेत्री म्हणून करियर सुरू करण्याचा कॉन्फिडन्स या गाण्याने दिला.”

अभिनेता नील चव्हाणचेही हे पहिलेच गाणे आहे. नील म्हणतो, “माझ्या पहिल्या सीनच्या वेळी मी खूपच नर्व्हस होतो. शूटिंग पाहायला खूप गर्दी झाली होती. मी हिरोईनला पाहून शेताच्या बांधावरून पळत चाललेला असतो असा सीन होता. तेव्हा खूप पाऊस पडत होता.

शेतीच्या बांधावर खूप चिखल झाला होता. त्यामुळे घसरून पडायची शक्यता होती. पण न घसरता चेहऱ्यावर हसरे एक्सप्रेस घेऊन पळत जायचे होते. हा माझा सगळ्यात अवघड सीन होता. अनेक अडचणींना सामोरे जाऊन आम्ही गाणे पूर्ण केले. आता हे गाणे रिलीज होते आहे. याचा आम्हांला आनंद होतो आहे.

Back to top button