

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
धमक्या आणि ब्राह्मण समाजाने केलेल्या आंदोलनांनंतरही सरस्वतीदेवी, संभाजी भिडे आणि ब्राह्मण समाजाविषयीच्या केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ठाम आहेत. 'मी जे बोललो त्यावर जनता निर्णय घेईन. आजवर मला अनेक धमक्या आल्या आहेत. धमक्यांना मी घाबरत नाही, असे नमूद करत 'जाको राखे साईयां मार सके ना कोय, बाल न बांका कर सके जो जग बैरी होय' अशा शब्दांत भुजबळ यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे.
समाज दिनानिमित्त नाशिकमधील एका शाळेतील कार्यक्रमात भुजबळ यांनी सरस्वतीदेवी, संभाजी भिडे आणि ब्राह्मण समाजाविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर ब्राह्मण समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भुजबळ यांना मारण्याच्या धमक्याही दिल्या गेल्या. यासंदर्भात एकास अटकही झाली आहे. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने बुधवारी (दि. २३) नाशकात बैठक घेत भुजबळांचा पुतळा जाळला. केलेल्या वक्तव्याविषयी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ब्राह्मण समाजाने दिला. त्यानंतर गुरुवारी (दि.२४) भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे नमूद करत त्यांना चुकीची महिती दिली गेली, असा दावा केला आहे. ते म्हणाले की, मी कुठे चुकलो हे मला सांगितले तर मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे सुप्रिया सुळे यांचे वडील आहेत, तर अजित पवार हे भाऊ आहेत असे सांगत, या विषयावर अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. शहरातील गुन्हेगारांवर कारवाई होऊन गुन्हेगारी नियंत्रित झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
नाफेड मार्केटमध्ये खरेदीला उतरणार
काद्यांवर केंद्र व राज्य सरकारने मार्ग काढला असून, २,४१० रुपये प्रतिक्विंटल दराने नाफेड खरेदी करायला तयार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेत आहोत. मी स्वतः नाफेडच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. प्रत्यक्ष मार्केटमध्ये उतरून कांदा खरेदी करा, असे मी त्यांना सांगितले आहे, असे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा :