

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील वर्दळीच्या सातव चौकामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. यामुळे परिसरात वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. वाहनांच्या रांगा लागल्या. शहर पोलिसांना
याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बर्थ डे बॉय फरार झाला. अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी चांदगुडे याच्यासह त्याच्या समर्थकांवर भादंवि कलम 143, 147, 149, 504, 506 व क्रिमिनल अमेंडमेंट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राहुल राजेंद्र मदने (रा. प्रगतीनगर, बारामती), विकास नानासो चंदनशिवे (रा. मळद, ता. बारामती), अक्षय भीमराव कांबळे (रा. बस स्थानकासमोर, आमराई, बारामती) व सागर रमेश आटोळे (रा. चांदणी चौक, कसबा, बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बारामती शहरात व तालुक्यात अलीकडील काळात रस्त्यांवर चौका-चौकात नेत्यांचे, दादांचे, भाईंचे त्यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच आले आहे. अनेकदा असे वाढदिवस साजरे करत असताना घातक शस्त्रांचा वापर करून केक कापले जातात. पोलिसांकडून अशा घटनांवर कारवाया केल्या जात आहेत; परंतु तरीही चांदगुडे व त्यांच्या मित्र परिवाराने भरदुपारी केक कापत
आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो मोडून काढला.
नागरिकांची मोठी वर्दळ असणार्या शहरातील सातव चौकात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर दादासाहेब चांदगुडे याचा वाढदिवस त्याच्या समर्थकांकडून केला जात होता. केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. चौकात अनेक तरुण जमा झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी चौकात धाव घेतली. पोलिसांनी या ठिकाणाहून चौघांना ताब्यात घेतले. अन्य लोक तेथून पसार झाले. त्यात बर्थ डे बॉयचाही समावेश होता. पोलिस आता त्याचा शोध घेत आहेत.
वाढदिवसानिमित्त भररस्त्यात केक कापणार्यांवर गुन्हे दाखल केले जातील. तरुण वयात गुन्हा दाखल झाला तर पुढील करिअरवर त्याचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे तरुणांनी असे प्रकार करू नयेत, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली.
हेही वाचा