संगमनेर पालिकेच्या रबरी गतिरोधकांचे वाजले की बारा ! | पुढारी

संगमनेर पालिकेच्या रबरी गतिरोधकांचे वाजले की बारा !

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील महत्वाच्या चौकात, रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी नगर पालिकेने वाहतुक सुरळीत व्हावी, यासाठी रबरी गतिरोधक बसवले मात्र अवघ्या 20 दिवसांपूर्वी बनवलेले गतिरोधक उखडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गतिरोधकासाठी पालिकेने केलेला लाखो रूपयांचा खर्च वाया गेला आहे. संगमनेर नगरपालिका विविध कामावर करीत असलेल्या अनावश्यक खर्चाबाबत माजी नगरसेवक व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सातत्याने हा खर्च वाढतच आहे.

प्रशासक राज असल्याने खर्चावर कुणाचेच नियंत्रण दिसत नाही. अनावश्यक कामाबाबत कोणीच जबाबदरी घेत नाही. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी डांबरी रस्ता करताना गतिरोधक टाकले, मात्र पालिकेने शहरातील बाजार पेठ, अकोले नाका, पेटीट कॉलेज, मेन रोड, सय्यद बाबा चौक, लाल बहादूर चौक आदी ठिकाणी रबरी गतिरोधक बसविले. या गतिरोधकांची मागणी कोणी केली. त्यांची गरज का भासली, याचा उलगडा अद्दाप झाला नाही. एवढा खर्च करूनही त्यांचा काहीच उपयोग न झाल्याने खर्च वाया गेला. रबरी गतिरोधक लावून अवघे 20 दिवस झाले या कालावधीत त्यांचे तुकडे पडले. काही ठिकाणचे गतिरोधक उडाले. त्यामुळे रस्त्यावरून चालताना गतिरोधक दिसत नाही.

बाजार पेठ, मेन रोड , अकोले नाका आदी ठिकाणी वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. यावर उपाय योजना न करता रबरी गतिरोधक लावून वाहतुक सुरळीत करण्यासाठी उचलले पाऊल चुकीच्या दिशेने पडले आहे. पालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना बाबत काहीच माहिती नाही. काम होताच बिल अदा करण्यात आले. कामाचा दर्जा न पाहता केवळ खर्च दाखविला जात आहे. मुख्याधिकारी सध्या प्रशासक आहे. नगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक असे कोणीच पालिकेत जाब विचारण्यासाठी नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. लोक प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते अलिप्त आहेत. पालिकेची निवडणुक काही महिन्यांवर आली आहे. नागरिकांमध्ये मात्र या सर्व कारभाराबाबत उलट- सुलट चर्चा ऐकू येत आहेत.

माजी नगरसेवकांकडून प्रतिक्रिया देण्यास नकार !
पालिकेत सुरु असलेल्या विविध कामाबाबत माजी नगरसेवकांना संपुर्ण कल्पना आहे. यापैकी काहीजण उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत आहेत. रबरी गतिरोधकांबाबत माजी नगरसेवकांशी संपर्क साधला असता, भितीपोटी यावर कुठलीच प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

Back to top button