पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जात असताना पोलिसांनी एक व्हिडिओ समोर आणला आहे. यामध्ये वारकरी नियमांचे उल्लंघन करीत पोलिसांना तुडवून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकच बाजू पाहून पोलिसांवर टीका करणाऱ्यांची तोंड बंद झाली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पोलिसांनी यंदा कडक बंदोबस्त आणि नियमावली केली होती.
पास शिवाय मंदिरात कोणालाही प्रवेश दिला नाही. मानाच्या दिंड्यामध्ये ७५ वारकरी मोजून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर काही तरुण वारकऱ्यांनी आक्षेप घेत नियम जुगारण्याच्या प्रयत्न करीत महाद्वार गाठण्याचा प्रयत्न केला. यावेळी वारकरी आणि पोलिसात काही वेळ धुमश्चक्री उडाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. यामध्ये पोलिस वारकऱ्यांशी झटापट करीत असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर लाठीचार्ज झाल्याच्या पोस्ट फिरू लागल्या. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले.
दरम्यान, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी लाठीचार्ज झालाच नाही, असे सांगून अफवा न पसरवण्याचे आवाहन केले. तसेच, आता एक व्हिडिओ समोर आणला आहे. यामध्ये वारकरी मंदिरात घुसण्यासाठी बळाचा वापर करीत असल्याचे दिसत आहे. पोलिस अडविण्याचा प्रयत्न करीत असताना तरुण वारकरी पोलिसांना न जुमानता त्यांना तुडवून पुढे गेल्याचे कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे.
हे ही वाचा :