

इंदूर, पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील ललीत पाटीदार (Lalit Patidar) या १७ वर्षांच्या युवकाला गावातील लोक बाल हनुमान म्हणतात, तर वर्गातील मुलं त्याला घाबरून असतात. वानरासारखा दिसणार ललीत आपला चावा घेईल, अशी भीती या मुलांना वाटते आणि ही मुलं त्याला मंकीबॉय म्हणून चिडवतात. (Werewolf Syndrome)
ललीतला अत्यंत दुर्मिळ असा वेअर वुल्फ आजार आहे. या आजाराला हायपर ट्रायकॉसिस असेही म्हटले जाते. या आजारात संपूर्ण चेहऱ्यावर केस उगवतात. ललीतचा चेहरा आणि शरीरावर लांब केस आहेत. "माझ्या घरात सगळेच नॉर्मल आहेत. वडील शेतकरी आहेत. मी १२वीमध्ये आहे आणि वडिलांना शेतीत मदत करतो."
जन्मपासून ललीतच्या शरीरावर केस आहेत. पण तो सहा वर्षांचा झाल्यानंतर केस जास्त असल्याचे त्याचा पालकांना जाणवले. त्यांनी एक डॉक्टरला दाखवल्यानंतर ललीतला वेअर वुल्फ आजार असल्याचे निष्पन्न झाले. यावर कोणताच उपाय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ललीत म्हणतो, "लहान मुलं मला घाबरतात. लहानपणी मुलं मला घाबरतात हे समजत नव्हते. नंतर लक्षात येऊ लागले की माझ्या सर्व शरीरावर केस आहेत आणि इतर मुलांना असे केस नसतात. लहान मुलांना वाटते की मी प्राणी आहे आणि त्यांचा चावा घेईन. पण आता वर्गात मित्र झाले आहेत आणि मी त्यांच्यासोबत खेळतो," असे ललीत सांगतो.
चेहऱ्यावरील केस लांब झाले की कापावे लागतात, दाढीसारखेच हे केस वाढत असतात, असे तो सांगतो. "हा आजार दुर्मिळ आहे, फार कमी लोकांना असा आजार झालेला आहे. म्हणजेच मी इतरांपेक्षा वेगळा आहे. आपले वेगळेपण आपले सामर्थ्य ठरते," असे तो आत्मविश्वासाने सांगतो.
हेही वाचा