बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
शिमोग्यातील बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षचा खून करणार्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करा, जिहादी संघटनांची मालमत्ता जप्त करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने दिला आहे.
हर्षच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, कृष्णा भट यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कदम, भट म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जिहादी संघटनांकडून टार्गेट केले जात आहे. यासाठी पोलिसांनी संरक्षण देऊन जिहादी संघटनांवर बंदी घालावी.
जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून शिमोगा जिल्ह्यातील हिंदू कार्यकर्त्यांना लक्ष केले जात आहे. एसडीपीएल, पीएफआय, सीएफआय या संघटनांवर तत्काळ बंदी घालण्यात यावी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यात यावे. जिहादी संघटनांकडून हल्लेखोराना पैसा पुरवला आहेत. याची सखोल चौकशी करुन त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी. त्याचबरोबर हर्षच्या हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
मोर्चाची सुरुवात चन्नमा चौकातून करण्यात आली. कोर्ट रोडमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. आंदोलनामध्ये विजय जाधव, अनंत करिलिंगण्णावर, डॉ. बसवराज मांगोजी, हेमंत हावळ, डॉ. बी.जी.शिंदे, बजरंग दलाचे शहराध्यक्ष भावकाण्णा लोहार, रुद्र केसरी हरिस्वामी, नागनाथ स्वामी, स्वरुपानंद स्वामी, जयश्री जाधव, शांता सवदी, सविता किल्लेकर आदी सहभागी झाले होते.
हेही वाचलत का ?