

बेळगाव (कर्नाटक) : पुढारी वृत्तसेवा
दारू आणण्यासाठी दिलेल्या पैशातील शिल्लक रक्कम परत न दिल्याच्या कारणातून मित्राकडूनच मित्राचा बियर बाटलीने वार करून खून करण्यात आल्याची घटना वैभवनगर येथे शनिवारी रात्री उशिरा घडली. महम्मद दिलफुकार शेख (वय 27, रा. सत्यसाई कॉलनी, जनता प्लॉट, वैभवनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. घटनेची नोंद एपीएमसी पोलिसांत झाली आहे.या प्रकरणी मृताचा भाऊ अस्लम याने उस्मान लालासाब शेख (वय 44, सत्यसाई कॉलनी, जनता प्लॉट, वैभवनगर) याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री संशयित उस्मान याने मृत महम्मदकडे दारू आणण्यासाठी 500 रु. दिले होते. त्याप्रमाणेमहम्मदने दारु आणून दिली. त्यामधील 250 रु आपल्याकडे ठेवून घेतले. सदर शिल्लक पैसे उस्मानन मागितल्याने महम्मदने पैसे देण्यास नकार दिला. यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. रागेतून उस्मान याने जवळच पडलेल्या बियर बाटलीने महम्मदवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला. संशयीताला अटक करुन त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. एपीएमसी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.