नाशिक : सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार ; पोलिस आयुक्तांचे आदेश | पुढारी

नाशिक : सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार ; पोलिस आयुक्तांचे आदेश

नाशिक : राज्यात सध्या मशिदींवरी भोंग्यांवरुन राजकारण तापलेले असताना नाशिक पोलिस आयुक्तांनी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. नाशिक शहरातील सर्व प्रकारचे भोंगे आणि ध्वनिक्षेपके उतरविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असून विनापरवानगी कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊड स्पीकर लावता येणार नसल्याचे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरविल्यास लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा पठण करण्याचे आवाहन हिंदु बांधवांना राज ठाकरे यांनी केले आहे. अशात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी हे आदेश दिले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अनधिकृत भोंग्यांबाबत अशा स्वरुपाचे परिपत्रक जारी करणारे नाशिक हे पहिलेच शहर ठरले आहे.

तसेच मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळांना 3 मे पर्यंत भोंग्यासाठी परवानगी घेण्याची मुभा असणार आहे. त्यानंतर मात्र अनधिकृत भोंगे जप्त करण्यात येऊन कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मशिदीच्या 100 मीटर परिसराच्या आत हनुमान चालिसा पठणास मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचं उल्लंघन करणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. ज्यात 4 महिने तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा असेल. विशेष परिस्थितीत नाशिक पोलिस तडीपारीची कारवाई करु शकतात असेही पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button