शिवसेनेच्या हिंदुत्वावर राज ठाकरेंचा डोळा?, सेनेच्या असंतुष्टाना ओढण्याची खेळी | पुढारी

शिवसेनेच्या हिंदुत्वावर राज ठाकरेंचा डोळा?, सेनेच्या असंतुष्टाना ओढण्याची खेळी

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत सभा घेण्याचे रविवारी पुणे येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. ठाकरे यांनी ही घोषणा करताच सर्वांचेच लक्ष या ऐतिहासिक शहराकडे लागले आहे. ठाकरे यांनी सभेसाठी औरंगाबाद निवडणं, यामागील ‘राज’नितीची अनेक कारणे असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे, हिंदुत्वावरील पकड अधिक घट्ट करण्यासाठी राज ठाकरे हे नियोजनबद्ध व हळुवाररित्या दिवंगत हिंदुह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाऊलावर पाऊल टाकत असल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांच्या रुपातच आता राज ठाकरे झळकत आहेत. ‘गर्व से कहो हम हिंदू है, या घोषणाही मनसेने हिरावली आहे.

बाळासाहेबांचे मुंबई, ठाणेनंतर औरंगाबादवर विशेष प्रेम होते. राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडवा सभा, त्यानंतर ठाण्यात उत्तर सभा घेतली आणि आता महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी औरंगाबादेत सभा घेण्याचे जाहीर केले आहे. ही सभा त्याच सांस्कृतिक मैदानावर होणार आहे, जिथे बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 मध्ये सभा घेत ‘औरंगाबाद’चे नाव ‘संभाजीनगर’ करण्याची घोषणा केली होती. 2005 मध्ये याच मैदानावर शिवसेनाप्रमुखांची सभा सुरु असताना अजान झाली. त्यावेळी बाळासाहेबांनी अजानला जोरदार विरोध दर्शविला होता. आता मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत शासनाला 3 तारखेची डेडलाईन दिली आहे.
तत्पुर्वीच 1 तारखेला राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेण्याचे जाहीर केल्याने आतापासूनच ‘राज’कारण चांगलेच तापले आहे. या सभेत ‘ते’ काय गर्जतील, हे त्यावेळीच कळेल. परंतु एकूण ठाकरे यांच्या याही सभेसाठी तुफान गर्दी होईल, हे मात्र निश्चित.

सेनेच्या असंतुष्टाना ओढण्याची ‘राज’कीय खेळी

राजकीयदृष्या शिवसेनेसाठी मुंबई, ठाण्यानंतर औरंगाबाद महत्वाचा जिल्हा आहे. महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून सेनेची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या शहरातील तीन पैकी दोन आमदार सेनेचे आहेत. मात्र, शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्याने कट्टर शिवसैनिक नाराज आहेत. अशाच काही असंतुष्टाना जाळ्यात ओढून सेनेच्या किल्ल्यास सुरंग लावण्यासाठी ही ‘राज’ कीय खेळी असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक हे देखील सभेसाठी शहर निवडणे, यामागील कारण असल्याचे राजकीय जाणकारांनी नमूद केले.

मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह, मैदानही केले बुक 

राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेण्याचे जाहीर करताच येथील मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. ठाणे येथील उत्तर सभेत आलेल्या आडकाठ्या टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी रविवारीच सभेसाठी सांस्कृतिक मंडळ मैदान बुक केल्याचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर म्हणाले.

हनुमान जयंतीनिमित्ताने शनिवारी शहरात मनसैनिकांनी सामुहिक हनुमान चालिसा पठण केले. जिल्ह्यात मनसेची मोठी ताकद असल्यानेच पक्षाध्यक्ष ठाकरे यांनी सभेसाठी औरंगाबादची निवड केल्याचे महानगर अध्यक्ष बिपीन नाईक म्हणाले.

Back to top button