अंकली : पुढारी वृत्तसेवा ; कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची चिकोडी आगाराची बस व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने चिकोडीचे दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी चिकोडी-मिरज मार्गावरील केरुरवाडी क्रॉसजवळ घडली. संतोष शंकर हुजरे (वय 27) व श्रीशैल महादेव कोरवी (वय 27) अशी मृतांची नावे असून, ते दोघेही चिकोडीचे आहेत. बसचालकाला अंकली पोलिसांनी अटक केली आहे.
चिकोडी आगाराची बस (केए 42 एफ 1378) मिरजहून बेळगावकडे जात होती. तर युवक चिकोडीहून अंकलीकडे गवंडी काम करण्यासाठी जात होते. केरुरवाडी क्रॉसजवळ बसची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच ठार झाले. अपघातानंतर दोन्ही युवकांचे मृतदेह बसच्या मध्यभागी जाऊन अडकले होते. मृतदेह काढताना पोलिसांना कसरत करावी लागली. दोन्ही देहांचे अवयव विखुरले होते.
घटनास्थळी चिकोडीचे सीपीआय आर. आर. पाटील, अंकली पोलिस ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक एन. एस. भरत, सहाय्यक उपनिरीक्षक सिद्धकुमार परमानट्टी यांनी भेट देऊन पाहणी केली. चिकोडी सार्वजनिक रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
चिकोडी-मिरज या आंतरराज्य मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत.
हेही वाचलंत का?