बंगळूर : पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील एका शिक्षकाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला वर्गात 'कसाब' म्हणून (Kasab Remark Row) संबोधले होते. विद्यार्थ्याला दहशतवाद्याचे नाव घेऊन संबोधल्यामुळे संबंधित शिक्षकाला निलंबित करण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांना 'रावण' आणि 'शकुनी' असे संबोधले तरी त्यावर वाद होत नाही. यामुळे एका सहाय्यक प्राध्यापकाने एका विद्यार्थ्याना 'कसाब' असे संबोधणे ही फार मोठी बाब नसल्याचे बी सी नागेश यांनी म्हटले आहे.
शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्याला कसाब असे संबोधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कसाब म्हणून संबोधल्यानंतर विद्यार्थी त्यावर आक्षेप घेतो. त्यानंतर शिक्षक त्या विद्यार्थ्याची माफी मागतो. तुम्ही वर्गात सर्वासमोर माझा दहशतवादी म्हणून उल्लेख कसा काय केला? असा जाब तो विचारत असल्याचे व्हिडिओत दिसते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सदर प्राध्यापकाला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित शिक्षण संस्थेने या घटनेच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री नागेश यांनी पत्रकारांना सांगितले, विद्यार्थ्याला दहशतवादी म्हणून संबोधल्यानंतर शिक्षकाने माफी मागितल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसून येते. पण यावरुन व्होट बँक डोळ्यासमोर ठेवून आवाहन करणे हे केवळ राजकारण आहे. गुजरातमधील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'रावण त्याच्या १०० डोक्यांसह' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जोरदार टीका केली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी कर्नाटकातील शिक्षणमंत्र्यांनी कसाब उल्लेखावर निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले आहे.
उडुपी येथील संबंधित शिक्षण संस्थेने या टिप्पणीवर अधिकृत आक्षेप घेत शिक्षकाला वर्गात प्रवेश करण्यास प्रतिबंधित केले आहे. "आम्ही विधानसभेतही असे अनेकदा बोललो आहोत. त्याचा मुद्दा बनवला जात नाही. कसाबबद्दल कोणी बोलले की तो वादाचा मुद्दा का केला जातो?" असे नागेश यांनी म्हटले आहे.
ही घटना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाली असून त्यात शिक्षक विद्यार्थ्याच्या आक्षेपावर केवळ एक विनोद म्हणून आपण बोलल्याचे सांगताना दिसत आहे. "२६/११ हा खिल्ली उडवण्याचा विषय नाही. मुस्लिम असणं आणि या देशात अशा गोष्टींना तोंड देणं गंमतीचा विषय नाही. वर्गात सगळ्यांसमोर तुम्ही मला दहशतवादी कसं म्हणू शकता? आता 'सॉरी' म्हणून काही नाही, सर," असे विद्यार्थ्याने म्हटल्याचे दिसते. (Kasab Remark Row)