समलिंगी वकिलाच्या नावाला न्यायाधीश म्हणून केंद्राचा आक्षेप | पुढारी

समलिंगी वकिलाच्या नावाला न्यायाधीश म्हणून केंद्राचा आक्षेप

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  अॅड. सौरभ कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी निवड करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला आहे. यावर कॉलेजियमने पुनर्विचार करावा, असे केंद्राने कळविले आहे. शिवाय, केंद्राने सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी कॉलेजियमकडून पाठवण्यात आलेली अनेक नावे कॉलेजियमकडे मंजुरी न देता परत पाठवली आहेत.

अॅड. कृपाल यांनी माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यासोबत कनिष्ठ म्हणून काम केले आहे, ते कायद्याचे तज्ज्ञही आहेत. माजी सरन्यायाधीश बी. एन. कृपाल हे अॅड. सौरभ यांचे वडील आहेत. अॅड. कृपाल हे समलिंगी आहेत. त्यांनी ‘सेक्स अँड द सुप्रीम कोर्ट’ या पुस्तकाचे संपादनही केले आहे. गतवर्षी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने ११ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या बैठकीत त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी, २०१७ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनेही सौरभ कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.

आयबीचा अहवाल विरोधात

सौरभ कृपाल यांचा लैंगिक जोडीदार युरोपियन असून, स्वीस दूतावासात काम करतो. परदेशी जोडीदारामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे नाव नाकारण्यात आले होते. मी समलिंगी आहे, हेच मला मिळालेल्या नकारामागचे कारण आहे, असे अॅड. सौरभ कृपाल यांचे म्हणणे आहे.

Back to top button