पालघर : जेव्हा श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीसाठी येतात.. आ. भुसारा यांची भावनिक पोस्ट व्हायरल | पुढारी

पालघर : जेव्हा श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीसाठी येतात.. आ. भुसारा यांची भावनिक पोस्ट व्हायरल

मोखाडा; प्रतिनिधी :  ज्याप्रमाणे सुदामा आणि श्रीकृष्णाच्या मैत्रीचा आदर्श आजही दिला जातो. यामध्ये सुदामा गरीब मित्र श्रीकृष्ण द्वारकेचा राजा मात्र या भेटीच्या प्रसंगातून आजच्या पिढीला मैत्री ही मैत्री असते, गरीब-श्रीमंत असा भेद नसतो, अशी शिकवण आजही शाळा प्रवचन कीर्तनातून देण्यात येते, त्याचीच आठवण करीत विक्रमगड विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील भुसारा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली.

या पोस्ट व्हायरल होण्याचे निमित्त होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क भुसारा यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्ताने भेट दिली. ही भेट सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहे. कारण, अजित पवार ज्याप्रमाणे आपल्या कणखर नेतृत्व आणि कडक स्वभावाने परिचित आहेत, त्याचप्रमाणे आपल्या संवेदनशीलपणाचीही दर्शन त्यांच्या कृतीतून दिसून येते.

आमदार सुनील भुसारा यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये यांचे दिवंगत वडील चंद्रकांत भुसारा यांनी २०१२ साली एक घर बांधण्याचे स्वप्न बघितले होते. बांधकाम हाती घेतले मात्र तेव्हाच त्यांचे निधन झाले, त्यानंतर घरातला मोठा मुलगा म्हणून आमदार भुसारांवर सर्व कुटुंबाची जबाबदारी आली. यामध्ये छोटा भाऊ एक बहीण यांची लग्ने त्यानंतर २०१४ ची विधानसभा निवडणूक, त्यानंतर २०१९ ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीची तयारी यामध्ये वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरीच धडपड करावी. अगदी कालपरवाच श्रीकृष्णचंद्र निवासाची निर्मिती झाली. या घराच्या गृहप्रवेशासाठी अजित पवार येतील का? त्यांना आमंत्रण दिले तर आपला अत्यंत व्यस्त वेळ सोडून ते माझ्यासारख्या एका सर्वसामान्य आदिवासी आमदाराच्या कार्यक्रमाला येतील का, अशा अनेक शंका भुसारा यांच्या मनामध्ये होत्या. भीतभीतच पवारांना या कार्यक्रमाविषयी कळवल. त्यांनी एका मिनिटात होकार देताच भुसारांसाठी आभाळच ठेंगणे झाले.

भली भली दिग्गज मंडळी अजित पवार यांनी त्यांच्या कार्यक्रमाला यावे, यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, भुसारांच्या साध्या विनंतीवरून पवार आल्याने आमदार भुसारा अतिशय भावनिक झाल्यानंतर त्यांना समाजमाध्यमावर या आशयाची पोस्ट टाकली. भुसारा यांच्यावर अजित पवारांचा असणारा वरदहस्त सर्वश्रुत आहे. मात्र, वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावून अजित पवारांचे भुसारांवर विशेष प्रेम आहेच, यावर शिक्कामोर्तब झाले हे नक्की. या भेटीप्रसंगी भुसारा यांच्या घरी पवारांनी मनसोक्त जेवणही केले. यावेळी ज्याप्रमाणे सुदामाच्या घरी श्रीकृष्ण पोहोचले, त्याप्रमाणेच माझ्यासारख्या सर्वपसामान्यांच्या घरी अजित पवार आल्याची भावना भुसारा यांनी व्यक्त केली.

Back to top button