गणेश भक्तांवर काळाचा घाला! विजापूर- हुबळी महामार्गावर बस-कारचा अपघात, एकाच कुटुंबातील तिघेजण ठार | पुढारी

गणेश भक्तांवर काळाचा घाला! विजापूर- हुबळी महामार्गावर बस-कारचा अपघात, एकाच कुटुंबातील तिघेजण ठार

अंकली; प्रतिनिधी : विजापूर- हुबळी या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस आणि दोन कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी रात्री कोल्हार तालुक्यातील कडपट्टी गावाजवळ घडली. सदर अपघातात ठार झालेले गुलबर्गा येथील रहिवासी आहेत. या घटनेची नोंद कोल्हार पोलिस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की काल गुलबर्गा येथील रहिवासी घरी गणेश प्रतिष्ठापना करून परत हुबळीकडे जात होते. या दरम्यान विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील कडपट्टी येथे राज्य परिवहन महामंडळाची बस व कारगाडी यांच्यात अपघात झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी दोघांचा तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला.

गुलबर्गा येथील सुनंदा मल्लिकार्जुन कलशेट्टी (वय २५) व त्यांची मुलगी सुमन मल्लिकार्जुन कलशेट्टी (वय ३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झालेले शरनमा बसवराज कलशेट्टी(वय ५५) यांना उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. तर उमेश कलशेट्टी व सुरेखा कलशेट्टी हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विजापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कोल्हार पोलीस स्थानकाचे फौजदार प्रीतम नाईक यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.

 हे ही वाचा :

Back to top button