कोल्हापूर : ग्रीन कॉरिडोरमध्ये अपघात, तरीही यकृत धडधडले; सांगरूळच्या महिलेने दिले तिघांना जीवदान | पुढारी

कोल्हापूर : ग्रीन कॉरिडोरमध्ये अपघात, तरीही यकृत धडधडले; सांगरूळच्या महिलेने दिले तिघांना जीवदान

कोल्हापूर/सांगरूळ; पुढारी वृत्तसेवा : सांगरूळ (ता. करवीर) येथील महिलेचा मेंदूतील रक्‍तस्रावाने मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांनी तिचे यकृत व किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बुधवारी कोल्हापूर ते पुणे ग्रीन कॉरिडोर करण्यात आला. या कॉरिडोरमधून संबंधित महिलेचे यकृत व किडनी रुग्णवाहिकेतून नेत असताना राष्ट्रीय महामार्गावर किकवी (ता. भोर) येथे टायर फुटून अपघात झाला. मात्र, क्षणाचाही विलंब न करता चालकाने दुसर्‍या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. ती रुग्णवाहिका आल्यानंतर त्यामध्ये यकृत ठेवण्यात आले. त्यानंतर सुरक्षितपणे यकृत पुण्याला पोहोचून आवश्यक रुग्णावर त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. ग्रीन कॉरिडोरमध्ये अपघातानंतरही त्या महिलेचे यकृत धडधडले.

मेंदूत रक्‍तस्राव होऊन ब्नेन डेड झालेल्या सांगरूळ येथील राणी विलास मगदूम (वय 40) या महिलेचे यकृत आणि किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय मगदूम परिवाराने घेतला. दरम्यान, ग्रीन कॉरिडोरने यकृत पुण्याला घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा (एम.एच. 14 जेएल 8805) टायर महामार्गावर किकवी (ता. भोर) येथे फुटला.

या अपघातामध्ये डॉक्टर आणि एक व्यक्‍ती किरकोळ जखमी झाले आहेत. यकृत व जखमींना नरेंद्र महाराज, नाणीज या संस्थेच्या रुग्णवाहिकेतून रूबी हॉस्पिटल येथे सुरक्षित पोहोचविण्यात आले. डायमंड हॉस्पिटलमध्ये अवयव काढून घेण्याची ही शस्त्रक्रिया झाली. हे अवयव प्रत्यारोपणासाठी कोल्हापूरसह सोलापूर, पुणे येथील रुग्णालयाकडे पाठविले.

तिघांना मिळाले जीवदान

पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्येे यकृत, सोलापुरातील अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये एक किडनी, तर कोल्हापूरमधील डायमंड हॉस्पिटलमधील एका रुग्णावर दुसर्‍या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.

मगदूम यांना ब्रेन डेड घोषित केल्यानंतर हॉस्पिटल प्रशासन आणि झोनल ट्रान्स्प्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर यांनी मगदूम कुटुंबीयांना अवयवदानाविषयी माहिती दिली. त्यानंतर मगदूम परिवाराने हा निर्णय घेतला. यकृत व दोन्ही किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. विलास नाईक, डॉ. साईप्रसाद, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, डॉ. मकरंद जोशी, डॉ. किशोर देवरे, डॉ. आनंद सलगर, धनश्री मिरजकर यांच्यासह वैद्यकीय पथकाने परिश्रम घेतले.

होता सोन्याचा संसार…

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विलास मगदूम यांनी मोठ्या हिमतीने राणी यांच्या साथीने संसार फुलवला होता. मात्र, त्यांच्या सुखी संसाराला द‍ृष्ट लागल्याची हळहळ गावातून व्यक्‍त होत आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Back to top button