यकृताचे आरोग्य सुद‍ृढ ठेवण्यासाठी… | पुढारी

यकृताचे आरोग्य सुद‍ृढ ठेवण्यासाठी...

यकृताचे कार्य सुरळीत सुरू आहे का, हे तपासणीकरिता कोणत्या चाचण्या कराव्यात, त्यांचे फायदे काय आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. यकृत कार्य चाचणी (यकृत पॅनेल म्हणून ओळखली जाणारी चाचणी) या रक्तचाचण्या आपल्या यकृताद्वारे तयार करण्यात आलेल्या भिन्‍न एन्झाइम्स, प्रथिने आणि इतर पदार्थांचे मोजमाप करण्यात मदत करतात. या चाचण्या यकृताच्या एकूण आरोग्यावर लक्ष ठेवण्यात मदत करतात. एकाच रक्ताच्या नमुन्यावर या विविध चाचण्या केल्या जाऊ शकतात आणि त्यात अल्ब्युमिन, यकृतामध्ये तयार झालेले प्रथिने, एकूण प्रथिने जे रक्तातील एकूण प्रथिनांचे प्रमाण मोजतात, एएलपी (अल्कलाईन फॉस्फेटस), एएलटी (अलानाईन ट्रान्समिनेज) यांचा समावेश असतो.

एएसटी (एस्पार्टेट एमिनोट्रान्सफेरेस), आणि गॅमा-ग्लुटामिल ट्रान्सफरेज (जीजीटी) हे यकृताने बनवलेले वेगवेगळे एंजाइम्स आहेत. लॅक्टेट डिहायड्रोजनेज (एलडी) हे शरीराच्या बहुतांश पेशींमध्ये आढळणारे एक एन्झाइम आहे. जेव्हा रोगामुळे किंवा दुखापतीमुळे पेशींचे नुकसान होते तेव्हा ते रक्तामध्ये सोडले जाते. वरील गोष्टी शिफारस केलेल्या सामान्य श्रेणीमध्ये नसतील, तर त्या व्यक्तीमध्ये यकृताचा आजार आढळू शकतो. या चाचण्यांना यकृत कार्य चाचणी, यकृत प्रोफाईल हेपॅटिक फंक्शन पॅनेल आणि एलएफटी असेही म्हटले जाऊ शकते.

यकृत कार्यचाचण्या

या चाचण्यांमुळे हिपॅटायटिसचे निदान करण्यात आणि यकृताच्या आजारावरील उपचारांवर लक्ष ठेवण्यास मदत होऊ शकते. उपचार कार्य करत आहे की नाही हे समजून घेण्यासाठी या चाचण्या तुम्हाला मदत करू शकतात. या चाचण्या यकृताचे नुकसान किंवा सिरोसिसचे निरीक्षण करण्यास मदत करतात. काही औषधांचे दुष्परिणाम देखील या चाचण्यांद्वारे तपासले जाऊ शकतात.

यकृत कार्य चाचणीची आवश्यकता

कावीळसारखी लक्षणे असलेल्या व्यक्तीस, ज्या स्थितीमुळे तुमची त्वचा आणि डोळे पिवळे होतात, मळमळ, उलट्या, अतिसार, ओटीपोटात दुखणे, गडद रंगाची लघवी, फिकट रंगाचे शौचाला होणे आणि थकवा जाणवत असल्यास या चाचण्या करणे आवश्यक असते. किडनी रोगाचा कौटुंबिक इतिहास, मद्यपानाची वाईट सवय, हिपॅटायटीस विषाणूच्या संपर्कात येण्याची भीती असेल आणि किडनीवर विपरीत परिणाम करणारी औषधे घेत असाल तेव्हादेखील या चाचण्यांची निवड करू शकता.

यकृताची स्थिती जाणून घेण्यासाठी हातातील रक्तवाहिनीतून एक लहान सुई वापरून रक्‍ताचा नमुना काढला जाईल. यकृत कार्य चाचणीचे एक किंवा अधिक निदान हे सामान्य नसल्यास यकृत खराब झाले आहे किंवा योग्यरीत्या कार्यरत नाही असा अर्थ लावला जातो. हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आणि मद्यपानासारख्या वाईट सवयीमुळे यकृताचे नुकसान होऊ शकते, ज्यामध्ये मद्यपान, यकृताचा कर्करोग आणि मधुमेह यांचा समावेश होतो. यकृताच्या कार्यात अडचणी येत असल्यास त्यानुसार उपचार सुरू करावे लागतात. उशीर केल्याने गंभीर गुंतागुंत होऊ शकते किंवा जीवही गमवावा लागू शकतो.

  • डॉ. निरंजन नायक

Back to top button