

पुढारी ऑनलाईन डेस्क
देशात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात आल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५ हजार १०२ नवे रुग्ण (new COVID19 cases) आढळून आले आहेत. तर २७८ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ३१ हजार ३७७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात १ लाख ६४ हजार ५२२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट १.२८ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख १२ हजार ६२२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर आतापर्यंत ४ कोटी २१ लाख ८९ हजार ८८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
याआधीच्या दिवशी १३ हजार ४५ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २३५ रूग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ३४ हजार २२६ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.३८ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर १.२४ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर १.९८ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७६ कोटी १९ लाख ३९ हजार २० डोस देण्यात आले आहेत. यातील ३५.५० लाख डोस सोमवारी दिवसभरात देण्यात आले. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत १.९१ कोटी बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १७२ कोटी ६१ लाख ५९ हजार ५२० डोस पुरवले आहेत. यातील ११ कोटी १७ लाख ६ हजार ७४२ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७६ कोटी १२ लाख ३० हजार ५८० कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १० लाख ८४ हजार २४७ तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
कोरोनावर जगभरात लसी विकसित झाल्या आणि लसीकरणही वेगाने झाले. त्यामुळेच सध्या जगात महामारीच्या नव्या लाटा मंदावलेल्या दिसून येत आहेत. भारतातही तिसर्या लाटेचा तीव्र प्रभाव जाणवला नाही. या पार्श्वभूमीवर आता एका 'युनिव्हर्सल व्हॅक्सिन'ची चर्चा सुरू झाली आहे. ही वैश्विक लस अशी असेल जी कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटस्वर प्रभावी ठरेल. 'नेचर' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. या 'व्हेरिएंट प्रूफ' लसीबाबत सर्वांनाच कुतुहल आहे. लसींचा दोन डोस किंवा बूस्टर डोसमुळेही मिळणारे संरक्षण कालौघात घटत जाते. आता अशा लसीची गरज आहे जी संक्रमणही रोखेल आणि गंभीर आजारही. अर्थात अशा 'युनिव्हर्सल व्हॅक्सिन'ची संकल्पना काही नवी नाही. 'युनिव्हर्सल फ्लू शॉट' बनवण्यासाठी वैज्ञानिक एका दशकापेक्षाही अधिक काळापासून प्रयत्न करीत आहेत.
दक्षिण कोरियात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. येथे एका दिवसात १ लाख ७० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. पहिल्यांदाच येथे रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाचे पंतप्रधान बू-क्यूम यांनी लोकांनी घाबरण्याचे कारण नाही असे म्हटले आहे. दरम्यान, सिंगापूरमध्येही कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. येथे २६ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले असल्याचे वृत्त आहे.