बेळगाव : हिजाबसाठी ठिय्या, कॉलेज बेमुदत बंद

बेळगाव : हिजाबसाठी ठिय्या, कॉलेज बेमुदत बंद

बेळगाव , पुढारी वृत्तसेवा : 
सदाशिवनगर येथील विजया पॅरामेडिकल कॉलेजसमोर हिजाबवरून विद्यार्थिनींनी ठिय्या आंदोलन छेडले आहे. परिणामी, जिल्हाधिकार्‍यांनी कॉलेज बेमुदत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. हिजाबबाबत उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच कॉलेज पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

विजया पॅरामेडिकल कॉलेजच्या मुस्लिम विद्यार्थिनी हिजाबसाठी अडून बसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कॉलेजच्या गेटसमोर हिजाबला परवानगी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या या विद्यार्थिनींनी आज तिसर्‍या दिवशी ठिय्या मांडला. खुद्द जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, प्राचार्य आणि वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी समजूत घालूनदेखील विद्यार्थिनी आपल्या मागणीवर ठाम आहेत. 15 विद्यार्थिनी हिजाब घालूनच कॉलेजला आल्या. त्यातील घरी गेलेल्या दोन विद्यार्थिनी परत कॉलेजमध्ये आल्या. उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश मेडिकल, पॅरामेडिकल, पदवी कॉलेजला लागू पडत नाही.

हिजाब घालून वर्गात बसण्यास अनुमती द्या, अशी मागणी करत त्यांनी वर्गासमोरच धरणे धरले. निदर्शक विद्यार्थिनींची समजूत घालण्याचे प्रयत्न प्राचार्य प्रकाश पाटील यांनी केले. मात्र ते व्यर्थ ठरले. अखेर जिल्हाधिकार्‍यांच्या पुढील आदेशापर्यंत प्राचार्य प्रकाश पाटील यांनी कॉलेजला बेमुदत सुटी जाहीर केली. यासंदर्भात बोलताना प्राचार्य प्रकाश पाटील म्हणाले, गेल्या 2 दिवसांपासून विद्यार्थिनींची समजूत घालण्यात येत आहे. मात्र त्या हिजाब घालण्यावर अडून बसल्या आहेत. त्यामुळे आम्हाला वर्ग भरविण्यास अडचण येत आहे. त्यामुळे नाईलाजाने कॉलेजला बेमुदत सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या पुढील आदेशापर्यंत कॉलेज बंद ठेवण्यात येईल. विद्यार्थिनींना कसलाही त्रास होऊ न देता आम्ही शिक्षण देत आहोत, हे प्रकरण मिटल्यानंरच पुन्हा वर्ग भरविण्यात येतील.

दरम्यान, कॉलेजला सुटी जाहीर केल्यावर विद्यार्थिनी आपापल्या घरी परतल्या. पोलिस बंदोबस्त जिल्हाधिकार्‍यांना कॉलेज आवारात हिजाब घालण्यास मंजुरी दिली आहे. पण, वर्गात हिजाब वापरण्यात येवू नये, असे सांगितले आहे. तरीही वर्गात हिजाबसाठी निदर्शने करण्यात आली. त्यामुळे कॉलेज परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुख्य न्यायमूर्तींना पत्र

हिजाबविषयी उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाचा चुकीचा अर्थ लावण्यात येत असल्याचे सांगून मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांना अनावृत्त पत्र लिहिण्यात आले आहे. पत्रावर सुमारे 900 जणांच्या सह्या आहेत. विद्यार्थिनी आणि शिक्षिकांना सर्वांसमोर हिजाब काढण्याची सूचना देण्यात येत आहे. हिजाब परिधान करून शाळा-महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे.

गणवेश किंवा वस्त्रसंहितेचा नियम कॉलेज व्यवस्थापनाने जारी केला आहे. पण, अनेक कॉलेज व्यवस्थापनांनी हा नियम लागू केलेला नाही. अशा कॉलेजमध्ये अंतरिम आदेश लागू करता येत नाही. पण, सर्वच शिक्षण संस्थांनी हिजाबवर निर्बंध घालण्यात आल्याची माहिती पत्रामध्ये देण्यात आली आहे. अवनी चोक्सी, प्रज्वल शास्त्री, अशोक मदरीदास, अद्बुल जमीर, ममता राव आदींच्या सह्या केल्या आहेत.

हे ही वाचलं का  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news