उत्तर प्रदेशात आज तिसर्‍या टप्प्यासाठी, तर पंजाबमध्ये ११७ जागांसाठी मतदान | पुढारी

उत्तर प्रदेशात आज तिसर्‍या टप्प्यासाठी, तर पंजाबमध्ये ११७ जागांसाठी मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क :  उत्तर प्रदेशात तिसर्‍या टप्प्यातील विधानसभा आणि पंजाबमधील 117 जागांसाठी रविवारी होत आहे. उत्तर प्रदेशात 16 जिल्ह्यांतील 59 जागांसाठी हे मतदान होईल. उत्तर प्रदेशात पाच लढती लक्षवेधी असून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यांच्यासमोर आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचे आव्हान असेल. पंजाबमध्ये चौरंगी लढतीच्या शक्यतेने वातावरण तापले असून 1 हजार 304 उमेदवारांची सत्त्वपरीक्षा आहे.

करहलमधील विधानसभा निवडणूक सर्वात लक्ष्यवेधी असणार आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि भाजपचे माजी केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह यांच्यात प्रमुख लढत आहे. अनेक वर्षांपासून या जागेवर समाजवादी पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे बघेल हे अखिलेश यांच्यापुढे आव्हान निर्माण करतील काय, हा आता चर्चेचा विषय आहे. बघेल यांनी 2014 मध्ये समाजवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी मुलायम सिंह यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवले आहेत. करहलमध्ये सुमारे 3 लाख 71 हजार मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 44 हजार (38 टक्के) मतदार यादव आहेत, तर मुस्लिम, शाक्य, ठाकूर, ब्राह्मण, लोधी आणि जाट समाजाच्या मतदारांचा यामध्ये समावेश आहे.

शिवपाल यादव यांना भाजपचे विनय शाक्य यांचे आव्हान

इटावा जिल्ह्यातील जसवंतनगरमध्ये कडवी टक्कर आहे. समाजवादीच्या तिकिटावर शिवपाल यादव निवडणूक रिंगणात आहेत तर भाजपकडून 32 वर्षांचे सर्वाधिक चर्चित चेहरा विनय शाक्य रिंगणात आहेत. गेल्या पाच विधानसभा निवडणुकीत या जागेवर समाजवादीचे वर्चस्व कायम आहे.

सादाबादमध्ये दोन माजी मंत्री आमने-सामने

हाथरस जिल्ह्यातील सादाबाद मतदारसंघात भाजपला सोडून बसपामध्ये आलेले माजी मंत्री रामवीर उपाध्याय आणि सपा आणि रालोद आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुडू चौधरी आमने-सामने आहेत. दोघांमध्ये काट्याची लढत आहे.

कन्नौजची लढत लक्षवेधी

कन्नौज मतदारसंघात भाजपने कानपूरचे माजी कमिशनर असीम अरुण यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे अनिल दोहरे यांचे आव्हान असेल. दोहरे यांनी तीनवेळा आमदारकी भोगली आहे. दोघांमध्ये काट्याची लढत आहे.

सीसामऊ बालेकिल्ला राखण्याचा सपाचा प्रयत्न

कानपूरमधील सीसामऊ मतदारसंघात समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. समाजवादी पक्षाचे हाजी इरफान सोळंकी रिंगणात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सलिल विश्नोई यांना उमेदवारी दिली आहे.

पंजाबमध्ये रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाच्या वेळेपूर्वीपर्यंत सर्वच राजकीय पक्ष मतदारांमध्ये संदेश पोहोचवताना दिसून आले. विधानसभा निवडणुकीची थेट लढत सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध मुख्य विरोधी पक्ष आम आदमी पक्षामध्येच दिसून येत होती. परंतु, प्रचाराला रंग चढला तसतशी समीकरणे बदलत गेली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात घटनाक्रम बदलल्याने सर्वच मतदारसंघात चौरंगी लढत बघायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसने राज्याला चरणजीतसिंग चन्नी यांच्या रूपात पहिला दलित मुख्यमंत्री दिला. परंतु, पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले चन्नी यांच्या ‘भय्या’ वक्तव्यामुळे पक्षाला बरेच नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. मुख्य विरोधी पक्ष आम आदमी पक्षाला कुमार विश्वास यांच्या वक्तव्यामुळे नुकसान झाले आहे. विश्वास यांच्या वक्तव्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पत्र लिहून फुटीरतावादी संघटनांसोबत आम आदमीच्या संबंधाचा करण्यात आलेल्या आरोपांचा तपास करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. अशात विरोधी पक्ष सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून करण्यात आला.

या दोन्ही घटनाक्रमाचा थेट फायदा भाजप तसेच त्यांचा सहकारी पक्षांना होताना दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चन्नी आणि केजरीवाल यांच्या वक्तव्याचा आधार घेत दोन्ही पक्षांवर टीका केल्याने भाजपला फायदा होताना दिसून येत आहे. राज्यात शिरोमणी अकाली दलाकडे सर्वात मजबूत केडर आहे. याच केडरच्या आधारे शिरोमणी अकाली दल सत्तेच्या शर्यतीत आहे. परंतु, राजकीय विश्लेषकांच्या मते काँग्रेस व आपनंतर एसएडी तिसर्‍या स्थानी राहील.

या उमेदवारांकडे विशेष लक्ष

पटियाळा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, चमकौर साहिब आणि भदौड विधानसभेतून मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी, जलालाबादमधून सुखबीर सिंह बादल आणि लंबी विधानसभेतून माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल निवडणूक रिंगणात आहेत. धुरी विधानसभेतून भगवंत सिंह मान, अमृतसर (पूर्व) नवज्योतसिंह सिद्धू आणि विक्रम सिंह मजिठिया नशीब आजमावत आहेत.

Back to top button