पुणे-कोल्हापूर विद्युत रेल्वे मार्चमध्ये धावणार | पुढारी

पुणे-कोल्हापूर विद्युत रेल्वे मार्चमध्ये धावणार

मिरज, पुढारी वृत्तसेवा : शेणोली ते आदरकी या 112 किलोमीटर विद्युतीकरणाची पाहणी सुरक्षा आयुक्तांकडून येत्या दोन आठवड्यांत करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे ते कोल्हापूर दरम्यान पहिली विद्युत रेल्वे धावणार आहे. यासाठी 55 चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणासह दुहेरीकरण करण्यात येत आहे. तर मिरज-कोल्हापूर आणि मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर सध्या वापरात असलेल्या 327 किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये मिरज-कोल्हापूर दरम्यान विद्युत रेल्वे सुरू करण्यात आली होती.

कोरोनामुळे ती बंद

सध्या शेवटच्या टप्प्यातील शेणोली ते आदरकी या 112 किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. यामार्गावर यापूर्वी विद्युत चाचणी देखील घेण्यात आली आहे. याची शुक्रवारी मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी करण्यात येणार होती. परंतु ती रद्द करण्यात आली आहे.

या रेल्वे मार्गाची चाचणी आता येत्या दोन आठवड्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या पाहणीनंतर याला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे ते कोल्हापूर दरम्यान जुन्या एकेरी मार्गावरुन विद्युत रेल्वे सुरू होणार आहे.

तसेच मिरज-कुर्डुवाडी या 190 किलोमीटर रेल्वे मार्गाचे देखील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागाकडून विद्युत रेल्वे सुरू करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोन्ही मार्गावर विद्युत रेल्वे चालविण्यासाठी एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि मालगाडी चालविणार्‍या सर्व दर्जाच्या 55 चालकांना विद्युत इंजिन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रवाशांची विद्युत रेल्वेची प्रतिक्षा संपली असून लवकर त्यांना यातून प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवासी वेळेत देखील बचत होणार आहे. दुहेरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षी या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मिरज-लोंढा मार्गाचे काम अपूर्ण

दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या वतीने मिरज ते लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम करण्यात येत आहे. परंतु, या कामामध्ये दिरंगाई होत आहे. पुणे-मिरज-लोंढाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणासाठी यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात आणखीन सुमारे 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मिरज-पुणे रेल्वेमार्गावर विद्युत रेल्वे सुरू होत आहे. परंतु, लोंढा रेल्वेमार्गाचे काम अपूर्ण असल्याने या मार्गावर विद्युत रेल्वे धावण्यासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हे ही वाचलं का  

काश्मीरमध्ये चकमकीत शिगावचा जवान शहीद! 

उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये आज मतदान 

बुद्धिबळ : विश्वविजेत्याचे वारसदार!

Back to top button