न्यूयॉर्क : मणक्याच्या समस्यांमुळेही होतो मानसिक आरोग्यावर परिणाम | पुढारी

न्यूयॉर्क : मणक्याच्या समस्यांमुळेही होतो मानसिक आरोग्यावर परिणाम

न्यूयॉर्क : आपले मानसिक आरोग्य बिघडण्यामागे चिंता, ताणतणाव याशिवाय अन्यही कारणे असू शकतात. अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की मणक्याच्या हाडांशी निगडीत समस्यांमुळे 80 टक्के लोकांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित समस्याही निर्माण होतात.

या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी दोन प्रकारच्या प्रौढ लोकांच्या डेटाचे विश्‍लेषण केले. पहिल्या प्रकारातील लोकांमध्ये मणक्याच्या हाडाला दुखापत होणे किंवा अन्य त्रास होता. त्यांची संख्या 9 हजारांपेक्षा अधिक होती. दुसर्‍या प्रकारातील लोकांमध्ये अशी कोणतीही समस्या नव्हती. त्यांची संख्या 10 लाखांपेक्षाही अधिक होती. वैज्ञानिकांना असे आढळून आले की मणक्याच्या हाडांशी निगडीत समस्या ज्या लोकांमध्ये आहे त्यांना चिंतेशी संबंधित विकारांपासून ते निद्रानाश, ब्रेन फॉगपर्यंतच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. तसे पाहता एंग्झायटी किंवा डिप्रेशनसारख्या समस्या या मणक्याच्या दुखापतीशी संबंधित नसतात; पण निरोगी लोकांच्या तुलनेत अशा लोकांमध्ये या समस्या अधिक असू शकतात. मणक्यामधील क्रोनिक पेन म्हणजेच दीर्घकाळ राहणार्‍या वेदनाही व्यक्‍तीमध्ये मानसिक समस्या निर्माण करू शकतात. अनेकांमध्ये याच कारणामुळे मानसिक समस्या निर्माण झालेल्या दिसून आल्या.

हेही वाचलतं का?

Back to top button