निपाणी एपीएमसीवर 1 मार्चपासून प्रशासक

निपाणी एपीएमसीवर 1 मार्चपासून प्रशासक
Published on
Updated on

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) सदस्यांचा कार्यकाळ येत्या 1 मार्च रोजी संपणार आहे. कोरोनामुळे निवडणूक घेण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील कोणतीही सूचना आली नसल्याने एपीएमसीवर प्रशासक येण्याची शक्यता असल्याची माहिती सेक्रेटरी निरंजन हिरेमठ यांनी दिली.

जानेवारी 2017 मध्ये झालेल्या या निवडणुकीत एक जागा बिनविरोध झाली. यानंतर 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 7 जागांवर भाजप पुरस्कृत, 3 जागांवर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार तर नागरमुन्‍नोळीच्या जागेवर अपक्ष उमेदवार सुभाष पाटील यांनी विजय मिळवला. तत्कालीन खा. प्रकाश हुक्केरी यांनी अध्यक्ष निवडीपूर्वी तीन शासन नियुक्‍त संचालकांची निवड करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शासननियुक्‍त संचालक यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत मतदानाचा अधिकार असल्याने काँग्रेसचे संख्याबळ 4 वरून 7 वर गेले. याचवेळी अपक्ष संचालक सुभाष पाटील हे अखेरच्या क्षणी काँग्रेसच्या गोटात दाखल झाल्याने त्यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली. त्यामुळे एपीएमसीची सत्ता काँग्रेसने स्वतःकडे राखली होती. 1 मार्च रोजी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुभाष पाटील यांना काँग्रेसने पहिल्या 20 महिने अध्यक्ष होण्याची संधी दिली होती. उपाध्यक्षपदी चिदानंद बेल्ली 8 विरुद्ध 7 मतांनी निवडून आले होते.

निपाणी, चिकोडी हे दोन तालुके व रायबाग तालुक्यातील नागरमुन्नोळी क्षेत्र असे निपाणी एपीएमसीचे कार्यक्षेत्र आहे. एपीएमसीसाठी निपाणी तालुक्यातील निपाणी, गळतगा बेनाडी व कारदगा चिकोडी तालुक्यातील चिकोडी, एकसंबा, सदलगा, अंकली, करोशी, खडकलाट तसेच रायबाग तालुक्यातील नागरमुन्नोळी असे मतदारसंघ आहेत. याशिवाय व्यापारी गटातून एका प्रतिनिधीची निवड होते.

यानंतर 2019 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप सरकार अस्तित्त्वात आले. त्यामुळे शासननियुक्‍त संचालकांचे पद रद्द झाल्याने काँग्रेस पक्ष अल्पमतात आला. याचा फायदा घेत भाजपने निपाणी एपीएमसीवर सत्ता काबीज केली. यावेळी अध्यक्षपदी अमित साळवे यांची निवड करण्यात आली.

एपीएमसीच्या मालकीची जागा मिनी विधानसौध, निपाणी बस आगार, तसेच तालुका पंचायतीसाठी देण्याचा निर्णय साळवे यांच्या कार्यकाळात झाला. त्याचप्रमाणे जनावर बाजारात कूपनलिका खोदाई करून शेतकरी व पशुपालकांची पाण्याची सोय, शेतकर्‍यांना भाजीपाला व धान्य विक्रीसाठी एपीएमसीचे मोफत गाळे, धान्य साठवणुकीसाठी मोफत गोडाऊनची व्यवस्था आदी कामे साळवे यांच्या कार्यकाळात झाली. आता एपीएमसीचा कार्यकाळ संपत आल्याने 1 मार्चपासून प्रशासकराज येणार आहे. राज्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने अनेक निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात एप्रिल किंवा मे महिन्यात एपीएमसीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

निवडणूक दुरंगी की तिरंगी?

गत निवडणुकीत माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या गटाने निपाणी तालुक्यात स्वतंत्रपणे एपीएमसी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना अपयश आले होते. युवा नेते उत्तम पाटील यांनी ग्राम पंचायत निवडणूक स्वबळावर लढवून दाखवून आपली ताकद दाखवली आहे. त्यांचा गट प्रबळ होताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेससोबत लढणार की स्वतंत्रपणे, याची उत्सुकता आहे. चिकोडी तालुक्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news