अथणी : हेस्कॉममध्ये कोट्यवधींचा घोटाळा | पुढारी

अथणी : हेस्कॉममध्ये कोट्यवधींचा घोटाळा

अथणी/संबरगी : पुढारी वृत्तसेवा 

वीज कामासाठी मंजूर झालेल्या प्रत्यक निधीचे फक्त कागद रंगवून कोट्यवधी रुपयांची रक्कम हडप केली, असा ठपका ठेवत अथणी हेस्कॉम कार्यालयातील 20 अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. ही अफरातफर सुमारे 100 कोटींची असल्याचे सांगितले जाते. परंतु, रकमेला वरिष्ठांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

हुबळी येथील हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका डी. भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली. निलंबित 20 जणांमध्ये 16 अभियंते आहेत. एकाचवेळी इतके कर्मचारी निलंबित होण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे अथणी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विविध विभागातले सहायक कार्यकारी अभियंत्यांसह नोडल अधिकारी, लेखाधिकारी व लिपिकाचाही त्यात समावेश आहे.

अथणी हेस्कॉम कार्यालयाबाबत असंख्य तक्रारी लोकायुक्त, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या होत्या. त्यांची दखल घेऊन 14 सप्टेंबर रोजी हुबळी येथील वरिष्ठ पथकाने अचानक भेट देऊन कार्यालयाची झडती घेतली होती. स्वतः हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालिका, तांत्रिक विभागाचे संचालक, आर्थिक व्यवहार खात्याचे संचालक व मुख्य लेखापाल यांनी तपासणी केली होती. प्रत्येक कामामध्ये नियम डावलून निधीचा गैरवापर केल्याचे त्यांना आढळून आले होते.

तीन वर्षांत कोट्यवधींचा घोटाळा

वीजवाहिन्या व खांब बदलणे, अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मर बसविणे, पाणी पुरवठा योजनेसाठी खोदाई करणे, गरीबांसाठी वीज देण्यात येणारी गंगाकल्याण योजना आणि विशेषतः महापूर काळात खांब व वीज वाहिन्या तसेच जळालेले ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासाठी वापरलेल्या निधीची फक्त कागदपत्रे रंगवलेली आहेत. 2018 ते 2021 या तीन वर्षांत ही अफरातफर झालेली असल्याचे आहे. त्यानंतर 20 जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना निलंबित करण्यात आले.

38 पैकी 20 दोषी

विशेष पथकातील अधिकार्‍यांनी अथणी हेस्कॉम विभागातील 38 अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी केली होती. पैकी पहिल्या टप्प्यात 20 अधिकारी व कर्मचारी दोषी आढळून आल्याने त्यांना निलंबीत केल्याचा आदेश हुबळी हेस्कॉमने बजावला आहे. या सर्वांवर नोकर सेवा अधिनियम 2(1), (1, 11, 11) तसेच गैरव्यवहार असा ठपका ठेवत अधिनियम 33 अंतर्गत कलम 1 व 4 नुसार कारवाई करण्यात आली आहे. ज्या अधिकार्‍यांना निलंबित केले आहे, त्यांचा तात्पुरता प्रभार अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे.
अथणी हेस्कॉम कार्यालय भकास

हेस्कॉम अधिकार्‍यांची हेस्कॉम कार्यालयाला भेट  

हेस्कॉम अधिकार्‍यांनी बुधवारी पुन्हा एकदा अथणी हेस्कॉम कार्यालयाला भेट देऊन चौकशी केली. यावेळी काही अधिकार्‍यांवर कारवाई होणार, याची कुणकूण लागली होती. परंतु, गुरूवारी एकाचवेळी 20 अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित केल्याचा आदेश येऊन धडकताच कार्यालयासह शहरात एकच खळबळ उडाली. तोपर्यत आदेशाची प्रतच सोशल मिडियावर व्हायरल केली. त्यामुळे अथणी शहर व तालुक्यात दिवसभर याच घटनेची चर्चा सुरू होती. गुरूवारी दिवसभर हेस्कॉम कार्यालय भकास जाणवत होते. हेस्कॉममधील बरबटलेल्या भ्रष्टाचाराला चांगलाच लगाम बसल्याची चर्चा मात्र सुरू होती.

हे ही वाचलं का 

Back to top button