‘हवाला’ची प. महाराष्ट्रात कोट्यवधीची उलाढाल | पुढारी

‘हवाला’ची प. महाराष्ट्रात कोट्यवधीची उलाढाल

कोल्हापूर ; दिलीप भिसे : लॉकडाऊनमध्ये विस्कटलेली घडी ‘अनलॉक’मुळे पूर्वपदावर येत असतानाच ‘हवाला’ मार्फत चालणार्‍या आर्थिक उलाढालीने पश्‍चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात दीड वर्षानंतर उसळी घेतली आहे. कर्नाटक, गुजरात, राजस्थानसह पश्चिम बंगाल आणि दिल्‍ली कनेक्शनमधून दररोज कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होऊ लागल्या आहेत. कोल्हापूर, सांगलीसह सातारा आणि कर्नाटकातील बेळगाव, हुबळीमधील स्थानिक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.

लॉकडाऊन काळातील आर्थिक मंदीची झळ व्यापार, उद्योग, व्यावसायिकांसह सर्वसामान्य घटकांना सोसावी लागल्याने आर्थिक चक्रच विस्कळीत झाले होते. या काळात वित्तीय संस्थांच्या उलाढालीवरही मर्यादा आल्याने काहीअंशी देवाण-घेवाणीचे व्यवहारही थंडावले होते. कोट्यवधीच्या पटीत केवळ विश्‍वासावर चालणार्‍या ‘हवाला’ उलाढालीही ठप्प झाल्या होत्या.

दीड वर्षानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. ‘अनलॉक’नंतरही टप्प्याटप्प्याने आर्थिक स्थिती पूर्ववत होऊ लागल्यानंतर ‘हवाला’तील उलाढालीने उच्चांक गाठला आहे. बंगळूर (कर्नाटक), अहमदाबाद (गुजरात), जयपूर (राजस्थान), पणजी ( गोवा), कोलकाता (पश्‍चिम बंगाल), लखनौ (उत्तर प्रदेश) येथील टोळ्या पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातही कार्यरत झाल्या आहेत.

कमिशनचे आमिष दाखवून स्थानिक टोळ्यांना सक्रिय करण्यात आले आहे. ‘हवाला रॅकेट’मधून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठी सरासरी 15 ते 20 कोटींच्या उलाढाली होत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोट्यवधीच्या उलाढाली; मात्र यंत्रणा कोमात

नोव्हेंबरपासून आजअखेर कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांत ‘हवाला’च्या माध्यमातून कोट्यवधीच्या उलाढाली होत असतानाही प्रशासनाला खबरबात नसावी? तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी 2017 मध्ये चार परप्रांतीयांना बेड्या ठोकून 1 कोटी 67 लाखांची रोकड हस्तगत केली होती. दाभोळकर कॉर्नर परिसरातील कारवाईनंतर वर्षभर ‘हवाला’तील उलाढाली थंडावल्या होत्या.

Back to top button