प्रल्हाद जोशी, निराणी की सवदी? | पुढारी

प्रल्हाद जोशी, निराणी की सवदी?

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या वेगाला जोर आला आहे. येडियुराप्पा यांच्यानंतर कोण? या चर्चेला आता उधाण आले आहे. केंद्रीय कायदामंत्री प्रल्हाद जोशी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खाणउद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.

प्रल्हाद जोशी प्रभावी नेते आहेत. हुबळीतील इदगाह मैदान वादावेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. सवदी यांचा बेळगाव जिल्ह्यासह काही भागात प्रभाव आहे. काँग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप सत्ता आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

काही दिवसांपूर्वी पंचमसाली लिंगायत समाजाने विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळी सर्वांना संघटित करून हा वाद सामोपचाराने मिटवण्यात मुरुगेश निराणी यांनी यश मिळवले. सध्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी या तिन्ही नेत्यांची नावे चर्चेत असल्याची माहिती मिळाली आहे.

एकीकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा मठाधीशांच्या संपर्कात असून, आपली ताकद आजमावत आहेत. तर, दुसरीकडे इच्छुक दिल्लीवारी आणि मंदिरांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे 26 जुलै रोजी भाजपच्या द्विवर्षपूर्तीचे भाषण निरोपाचे ठरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीतच येडियुराप्पा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार हे निश्‍चित झाले असल्याचे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात बोलले जात आहे. 26 जुलै रोजी राज्यातील भाजप सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत.

या कार्यक्रमातच येडियुराप्पा आपल्या निरोपाचे भाषण करतील, असा कयास अनेकजण करत आहेत. त्यामुळेच 25 जुलै रोजी येडियुराप्पा यांनी भाजप आमदारांची बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सभेत आपल्याला दोन वर्षांत दिलेल्या सहकार्याबद्दल आमदार आणि मंत्री यांचे आभार मानणार आहेत. 26 जुलै रोजी विधानसभा सभागृहात ते आपल्या दोन वर्षांतील कामांचा लेखाजोखा मांडणार आहेत. त्याचवेळी ते आपले निरोपाचे भाषण करतील, असे भाजपच्या वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री येडीयुरप्पा राजीनामा देण्याआधी 23 जुलै रोजी आपल्या शिकारीपूर मतदारसंघात विविध विकासकामांना चालना देणार आहेत. 22 जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्व विकासकामांची मंजुरी घेण्यात येणार आहे. शिवाय अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार आहे.

मंत्री श्रीरामलू दिल्लीकडे

मुख्यमंत्री बदलावरून वेगवेगळ्या घडामोडी करत असतानाच समाजकल्याण खात्याचे मंत्री श्रीरामलू यांना दिल्लीचा बुलावा आला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मंत्री श्रीरामलू यांना कर्नाटक प्रदेश प्रभारी अरुण सिंग यांनी तात्काळ दिल्लीला येण्याचे अवतण धाडले. त्यामुळे बुधवारी सकाळी ते विमानाने दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत त्यांनी भाजपचे सरचिटणीस बी.एल. संतोष, प्रभारी अरुण सिंग, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक वरिष्ठांच्या भेटी घेतल्या आहेत. राज्यातील सध्याची स्थिती यावर चर्चा करण्यात आली आहे, असे समजते.

मंत्री श्रीरामलू हे वाल्मिकी समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. पण, त्यांच्याकडून आरोग्य खाते काढून घेऊन समाज कल्याण खाते पर्यंत मर्यादित ठेवण्यात आले होते. पण आता पुन्हा दिल्लीला बोलावून घेण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजकारणात काहीही होऊ शकते : सदानंद गौडा

येडियुराप्पा यांचे मुख्यमंत्रिपद काढून घेण्याबाबत कोणताही निर्णय झाला असेल असे आपल्याला वाटत नाही. पण हे राजकारण आहे, याठिकाणी काहीही होऊ शकते. त्यामुळे याविषयी वरिष्ठच योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी दिली आहे.

पत्रकारांशी बोलताना सदानंद गौडा म्हणाले, राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. त्यामुळे त्रास करून घ्यायचा नसतो. येडियुराप्पा दिल्लीला जाऊन आले, त्यावेळी त्यांच्या मंत्रिपदाच्या बदलाची शक्यता नव्हती. पण काहीही घडू शकते, याबाबत वरिष्ठ योग्य ते निर्णय घेऊ शकतात.

वरिष्ठांनी येडियुरप्पा यांनी राज्यात केलेल्या विकासकामांचे विशेष कौतुक केले आहे. कोरोना महामारी हाताळण्यात येडियुराप्पा यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच त्यांना विविध मठाधीशांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.

अनेकांची मंदिरांकडे धाव

येडियुराप्पा यांना पायउतार व्हावे लागणार हे जवळपास निश्चित समजलेल्या इच्छुकांनी आता मंदिरांकडे धावाधाव सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी खाणमंत्री मुरुगेश निराणी यांनी वाराणसी येथे विशेष पूजा केले होती.

आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आमदार अरविंद बेल्लद हेही वाराणसीला रवाना झाले आहेत. तर येडियुराप्पा यांची सुमारे 35 हून अधिक मठाधीशांनी राजीनामा देऊ नये यासाठी मनधरणी सुरू केली आहे. त्यामुळे एकूणच घडामोडींना वेग आला आहे.

Back to top button