संसदेत गदारोळ : विरोधकांनी कागदपत्रे फाडून भिरकावली 
Latest

संसदेत गदारोळ : लोकसभेत विरोधकांनी कागदपत्रे फाडून भिरकावली

रणजित गायकवाड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : विविध मुद्यांवरून आज संसदेत गदारोळ झाला. पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदे रद्द करावेत यासह इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी संसदेत घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे.

विरोधकांनी बुधवारीदेखील उभय सदनात प्रचंड राडेबाजी केली. लोकसभेत शून्य प्रहराच्या तासावेळी काँग्रेस, तृणमूलच्या सदस्यांनी हातातील कागदपत्रे फाडून पीठासीन अधिकारी सत्ताधारी बाकांच्या दिशेने भिरकावली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास गेल्या आठवड्यात सुरुवात झाली होती. मात्र विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे एकही दिवस उभय सदनात धडपणे कामकाज होऊ शकलेले नाही.

अधिक वाचा : 

लोकसभेत आज प्रश्नोत्तराचा तास गदारोळातच पार पडला. शून्य प्रहरापासून विरोधकांनी घोषणाबाजी वाढविली. पंतप्रधानांच्या निषेधाच्या तसेच 'खेला होबे'च्या घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.

पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी वारंवार आवाहन करूनही विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

गदारोळातच काँग्रेस, तृणमूलच्या सदस्यांनी हातातील कागदपत्रे फाडून ती अग्रवाल यांच्या तसेच सत्ताधारी बाकांच्या दिशेने भिरकावली.

विरोधी पक्षांचा आक्रमकपणा पाहून काही सत्ताधारी खासदारांनी सुद्धा आपल्याकडील कागदपत्रे फाडून फेकली.

अखेर गोंधळात कामकाज दुपारी 12.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. पुन्हा कार्यवाही सुरु झाल्यानंतरही गोंधळ न थांबल्याने कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

विरोधकांनी तोडली मर्यादा…

काँग्रेस आणि तृणमूलच्या खासदारांनी अक्राळस्तेपणा करून सदनाच्या मर्यादा तोडल्या असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

पीठासीन अधिकारी, मंत्र्यांवर कागदपत्रे फेकणे, कामकाजाची नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांना दाबणे, पत्रकार गॅलरीपर्यंत कागदे फेकणे या लोकशाहीला लज्जा आणणाऱ्या बाबी आहेत, असे ठाकूर म्हणाले.

शशी थरूर यांच्याविरोधात हक्कभंग नोटीस…

संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान अर्थात 'आयटी' विषयक समितीच्या बैठकीचा अजेंडा योग्य पध्दतीने सांगण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला. भाजपचे सदस्य निशिकांत दुबे यांनी लोकसभेत समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली.

या आरोपावरून भाजपच्या सदस्यांनी समितीच्या मंगळवारच्या बैठकीतून काढता पाय घेतला होता. आयटी समितीच्या बैठकीत पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली जाण्याचे संकेत थरूर यांनी दिले होते.

थरूर यांना समितीच्या अध्यक्षपदावरून हटविले जावे. जोवर त्यांना हटविले जात नाही, तोवर भाजपचे सदस्य बैठकीत सहभागी होणार नाहीत, असा इशारा यावेळी दुबे यांनी दिला.

अधिक वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT