मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. सकाळपासून उकाड्याने त्रस्त मुंबईकरांना सायंकाळी पावसाने झोडपून काढले. दरम्यान, मुंबईत पावसाची संततधार सुरू असल्याने सखल भागांत पाणी तुंबल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता.
राज्यात विदर्भ व मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झालेली असताना मुंबईत मात्र सकाळपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे हवामान विभागाचा जोरदार पावसाचा अंदाज फोल ठरतोय की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता.
मात्र सायंकाळी ६ वाजल्यानंतर पावसाची रिपरिप सुरु झाली. त्यानंतर रात्री ८ वाजता पावसाने जोर पकडला. परिणामी, गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
एसटी आणि खासगी ट्रॅव्हल्सपर्यंत वेळेत पोहचण्यासाठी अनेक प्रवाशांची दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई शहर व उपनगरात दिवसभर फक्त ५ मिमी पावसाची नोंद झाली होती. याउलट सायंकाळच्याय तीन तासांत ५० मिमी पाऊस पडल्याची माहिती मिळाली.
पश्चिम उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधारेने पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकावर धबधब्याचे चित्र निर्माण झाले होते.
अंधेरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ व ९ दरम्यान छत गतळीमुळे प्रवाशांचे हाल झाले.
किंग्ज सर्कल येथेही पाणी भरू लागल्याने दुकानदारांनी रात्री दुकानानजीक मुक्काम केल्याचे निदर्शनास आले.