सागर सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा; राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण | पुढारी

सागर सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा; राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेत पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांचे पूत्र सागर सदाभाऊ खोत आणि त्याचे साथीदार सोमवारी रात्री शस्त्रे घेऊन तांबवे येथील स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राविकिरण माने यांच्या घरात घुसले. त्यांनी माने यांना मारहाण केली.

माने यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात सागर आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रवीकिरण माने यांनी फिर्याद दिली आहे.

रवीकिरण यांच्या घरी आलेल्या शेजाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनाही खोत यांनी दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

माने हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहेत. ते युवा स्वाभिमानीचे वाळवा तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असतात.

चाकू, तलवार आणि गुप्तीचा धाक

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात वाद झाल्यावर वाळवा तालुक्यातील स्वाभिामानीच्या काही कार्यकर्त्यांसोबत सदाभाऊ खोत आणि त्यांचे पुत्र सागर यांच्याशी कार्यकर्त्यांसोबत नेहमी वाद होत असल्याचे दिसून आले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रवीकिरण यांच्या घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्यावर खोत यांच्यासह काहींनी तेथून पळ काढला. माने यांच्या घरातील लोक जेवत असताना हा प्रकार घडल्याचे माने यांनी फिर्यादीत सांगितले आहे.

सागर सदाभाऊ खोत यांच्याकडे चाकू, अभिजीत भांबुरे यांच्याकडे गुप्ती तर सत्यजीत कदम याच्याकडे तलवार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तुला मस्ती आली आहे का? जिवे मारल्याशिवाय सोडणार नाही, अशी धमकी दिली आहे.

Back to top button