बेळगाव 
Latest

बेळगाव : चोऽऽऽर.. चोऽऽऽर.. नव्हे, मी बाबुराव बोलतोय.!

backup backup

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : तो राजस्थानी तरूण… अनगोळमधील एका कंत्राटदाराकडे सेंट्रिंगचे काम करणारा… मंगळवारी मालकासोबत जोरात भांडण काढले… रागाच्या भरात भरपूर प्यायला अन् रात्रीच्या वेळी एका लेडिज हॉस्टेलमध्ये घुसला… त्याला पाहिलेल्या तरुणींनी चोऽऽऽर…चोऽऽऽर… चोर असा ओरडा केला…सुरक्षारक्षकही आला….त्याला चांगलाच बडवला… तो सांगत होता, अहो मी चोरी नाही बाबुराव… पण कोणी त्याचे ऐकले नाही.

भरपूर मार दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. खरंच तो चोर नव्हता, हे पोलिसांनाही त्याची नशा उतरल्यावर कळले. बाबू नामक तरुण अनगोळमधील एका बिल्डरकडे कामाला आहे. मंगळवारी तो नेहमीसारखाच कामावर गेला आला होता.

परंतु, मालकासोबत त्याचे भांडण झाले. त्यानंतर तो तो एका बारमध्ये गेला आणि भरपूर पिला. इतका प्यायला की नंतर त्यालाच कळेना आपण कुठे आहोत. दिवसभर पितच राहिला आणि भटकू लागला. शेवटी अनगोळमधून फिरत फिरत थेट रामदेव हॉटेलजवळ पोहोचला.

घुसला लेडिज हॉस्टेलमध्ये

आपण कुठे आहोत, काय करतोय व कुठे जायचे आहे? याचे कसलेच भान बाबूला नव्हते. रात्री अकराच्या सुमारास तो रामदेवजवळील बारमधून बाहेर पडून चालत चालत धर्मनाथ भवनकडे निघाला. तेथे त्याला येथील एका कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलचे फाटक उघडे दिसले. तो तेथे घुसला. काही तरी धडपड ऐकू आल्याने व कोणीतरी हालचाल करीत असल्याचे लक्षात येताच काही तरुणी खोलीबाहेर आल्या.

तेव्हा बाबुराव झोकांड्या देत चालल्याचे दिसले. या तरुणींनी चोऽऽऽर… चोऽऽऽर… अशी ओरड सुरू केली. आवाज ऐकून सुरक्षारक्षक आला.

त्याने बाबूला पकडले आणि चोर समजून सुरक्षारक्षकाने तसेच येथे जमलेल्या अन्य काहीजणांनी चांगलेच झोडपले. पण बाबूला काहीच सांगता येत नव्हते, मै बाबू हूँ इतकेच सांगत होता.

रात्री बाराच्या सुमारास ही माहिती माळमारुती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी त्याला ठाण्यात नेले. दुसर्‍या दिवशी पूर्ण नशा उतरल्यानंतर बाबूला आपण पोलिस ठाण्यात आहोत, हे कळले अन् तो घाबरला.

सविस्तर माहिती विचारल्यानंतर झालेली घटना त्याने कथन केली. यानंतर पोलिसांनाही हसू आवरेना.

त्यांनी खात्री पटवण्यासाठी मालकाला बोलावून घेतले.

मालकाने तो आपला कामगार आहे, असे सांगून त्याच्याशी संबंधित कागदपत्रेही दाखवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला मालकासोबत जाऊ दिले.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT