नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : बऱ्याच वेळाला लहान मुलांकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडतं. अशीच एक घटना बंगळुरू येथे घडली आहे. एका ३ वर्षाच्या मुलानं ५ सेंटिमीटर लांबीची गणपतीची मूर्ती गिळली असल्याचं समोर आलं आहे.
मूर्ती गिळल्यानंतर मुलाची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर मुलाचा एक्स-रे काढला. त्यामध्ये ही मूर्ती पाहून डाॅक्टरही आवाक् झाले. डाॅक्टरांनी त्वरीत हालचाल करून गणपतीची मूर्ती काढून मुलाचा जीव वाचवला.
कर्नाटकच्या बंगळुरूमधील ३ वर्षांच्या मुलाने ५ सेंटीमीटर लांबीची गणेश मूर्ती गिळली होती. प्रकृती बिघडल्याने या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचारानंतर मुलाला वाचवण्यात यश आलं आहे.
मुलावर बंगळुरूच्या मणिपाल रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या मुलाने खेळताना गणपती बाप्पाची छोटी मूर्ती गिळली होती. नंतर मुलाच्या छातीमध्ये दुखू लागलं.
त्याचबरोबर त्याला लाळ गिळतानाही त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी छाती आणि गळ्याचा एक्स-रे काढला. त्यात मुलाच्या शरीरात गणपतीची मूर्ती असल्याचं दिसून आलं.
डॉक्टरांनी एंडोस्कोपी तंत्रज्ञानाचा वापर करून ऑपरेशन केलं आणि शरीरातून ही मूर्ती बाहेर काढली. ऑपरेशननंतर काही तासातच त्याला डिस्चार्जही देण्यात आला. मूर्तीमुळे मुलाच्या अन्ननलिकेला इजा झाली होती.
डॉ. मनीष राय यांनी सांगितलं की, जेव्हा मुलाला रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र, तात्काळ उपचार मिळाल्यामुळे त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली आणि त्याला वाचवणं शक्य झालं. बंगळुरू येथे या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे.