नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर डॉ. प्रज्ञा सातव ह्या राजीव सातव यांच्या आठवणीने भावूक झाल्या. 'मी हिंगोलीत याआधी राजीव यांच्या सोबतीने काम करत होते. पण आज मी एकटी पडली आहे. अशा परिस्थितीत मी राजीवला मिस करतीय, असे म्हणत डॉ. प्रज्ञा यांनी राजीव सातव यांच्या आठवणी जाग्या केल्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच १४ जिल्हाध्यक्षांच्या निवडीही करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा सातव यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. प्रज्ञा यांनी राजीव सातव यांची क्षणाक्षणाला आठवण येत असल्याचे म्हटले.
आपल्याला मिळालेली संधी मोठी आहे. या कामात मोठा वाव आहे. त्यासाठी आपल्याला राजीवजींच्या कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळेल. याआधी हिंगोलीत राजीवजींच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. ज्यावेळी राजीवजी दिल्लीत असायचे त्यावेळी मी लोकांना भेटत असे. ते मला मार्गदर्शन करायचे. मला आता मोठी जबाबदारी मिळाली आहे. पण मी चांगले काम करुन दाखवेन, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राजीव सातव हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वास होते. कोरोनावरील उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
आता त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा यांना काँग्रेस कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
राजीव सातव यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी होती. तसेच ते काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते.