‘जनआशीर्वाद यात्रेला शिवसेनेचा विरोध नाही, पण…’ | पुढारी

'जनआशीर्वाद यात्रेला शिवसेनेचा विरोध नाही, पण...'

रत्‍नागिरी; पुढारी वृत्‍तसेवा : शिवसेनेचा जनआशीर्वाद यात्रेला विरोध नाही, पण नारायण राणे यांनी जर उद्धव ठाकरेंवर आरोप किंवा टीका केली तर मात्र आम्ही यात्रेला विरोध करणार अशी भूमिका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी मांडली.

नारायण राणे यांचा कोकणात जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्‍यात शिवसेना आणि भाजपकडून होर्डिंग उभी केली जात असल्‍याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचा जनआशीर्वाद यात्रेला विरोध नाही पण उद्धव ठाकरेंवर टीका केली तर यात्रेला विरोध करणार असल्‍याचे शिवसेनेने स्‍पष्‍ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा हा कोणाला ते हे ज्‍याचे त्‍याला माहिती होते. नारायण राणेंची मुले जर उद्धव ठाकरेंवर टीका करतील तर जनआशीर्वाद यात्रेला आमचा विरोध राहील. पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीने काम करीत आहे.

राणे हे सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत, उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने दोन्ही संयम ठेवला पाहिजे. एक बाजूने संयम कधी राहणार नाही, दोन्ही बाजूने संयम ठेवला तर तो राहील अशी भूमिका आमदार वैभव नाईक यांनी मांडली.

दरम्यान, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा आज शुक्रवारी (दि.२७) रत्नागिरीतून सुरु झाली. राणेंच्या आगमनावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी दौरा ४ वाजता आटोपून राणे सिंधुदुर्गात जाणार आहे.

नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता खारेपाटण येथे आगमन होणार आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने नारायण राणे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ही यात्रा तळेरे, वैभववाडी, फोंडाघाट मार्गे रात्री कणकवलीत दाखल होणार आहे.

या यात्रेची कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागताचे भव्य बॅनर लावले आहेत, कमानी उभारल्या आहेत. २८, २९ दोन दिवस ही यात्रा सिंधुदुर्गात असणार असून, रविवारी सायंकाळी या यात्रेचा समारोप सावंतवाडी येथे होणार आहे.

Back to top button